इंदुमती गणेश
कोल्हापूर : देशात १२ ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळा, महापर्वकालांची नेहमी चर्चा होते. मात्र या महापर्वकालात करवीरातील विशालतीर्थ भोगावती नदी शिंगणापूरचा समावेश असून गुरूने वृश्चिक राशीत प्रवेश केल्यानंतर होणारा वृश्चिक महापर्वकाल १२ आॅक्टोबरपासून करवीरक्षेत्री होत आहे.
पंचांगकर्त्यांनी यंदाच्या पंचांगात त्याचा समावेश करून त्यावर मोहोर उमटविली आहे. यंदा मात्र ‘नमामी पंचगंगा’ या संस्थेच्या वतीने महापर्वकालाचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे.गुरूने विशिष्ट राशीत प्रवेश केल्यानंतर देशातील बारा ठिकाणी कुंभमेळा, महापर्वकाल सुरू होतो. गुरूचा प्रत्येक राशीत वर्षभर मुक्काम असल्याने हा कालावधी वर्षाचा असतो. गुरूने सिंह राशीत प्रवेश केला की नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा, कुंभ राशीत प्रवेश केला की हरिद्वारमध्ये कुंभमेळा, कन्या राशीत प्रवेश केला की नृसिंहवाडीत कन्यागत महापर्वकाल होतो.
या काळात स्थानिक नदीमध्ये गंगा नदीचे अवतरण होते. ती वर्षभर या नदीच्या सान्निध्यात राहते आणि भक्त तिच्या भेटीला येतात, अशी संकल्पना आहे. निसर्ग, नदी, पर्यावरण आणि मानवाला जोडणारी सांस्कृतिक साखळी म्हणून महापर्वकालाचे महत्त्व आहे.या महापर्वकालामध्ये करवीरातील भोगावती नदीचा समावेश असल्याने शंकराचार्यांसह धार्मिक बाबींचे ज्ञान असलेल्या व्यक्ती या कालावधीत तेथे जाऊन स्नान करतात. हीच भोगावती नदी पुढे येऊन पंचगंगेला मिळते. नदीची स्वच्छता आणि तिचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘नमामी पंचगंगा’ नावाची संस्था स्थापन करण्यात येत असून, त्या संस्थेच्या वतीने या महापर्वकालाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी देशातील सर्व पीठांचे शंकराचार्य, धर्मपीठांचे गुरू, आखाडे यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
दोन भागांत महापर्वकालधार्मिक ग्रंथ व यंदाच्या वर्षीच्या मराठी पंचांगांमध्ये नकाशासहित महापर्वकालात भोगावतीचे स्थान विशद करण्यात आले आहे. यंदा ११ आॅक्टोबरला सायंकाळी ७ वाजून १९ मिनिटांनी गुरू वृश्चिक राशीत प्रवेश करीत आहे. तेव्हापासून शिंगणापूर येथे महापर्वकाल असतो. १२ आॅक्टोबरला येथील हटकेश्वराच्या मंगल स्नान महापर्वाची सुरुवात होईल. हा महापर्वकाल ११ आॅक्टोबर ते २९ मार्च २०१९ व २३ एप्रिल ते ५ नोव्हेंबर २०१९ या दोन कालावधींत होत आहे.
देशातील १२ महापर्वकालांमध्ये करवीरातील भोगावती व पर्यायाने पंचगंगा नदीचा समावेश ही धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही खूूप मोठी गोष्ट आहे. अज्ञानामुळे आजवर येथे महापर्वकाल साजरा झाला नाही. यंदा मात्र त्याचे आयोजन करून नदीचे महत्त्व आणि तिची स्वच्छता यांबद्दल जागृती करण्याचा प्रयत्न करणार आहे.- उमाकांत राणिंगा ‘नमामी पंचगंगा’ उपक्रमाचे मार्गदर्शक