कोल्हापूर : एसबीआय बँकेच्या नावाखाली क्रेडिट कार्डवर चार हजार पॉइंट जमा झाले आहेत. ते बँक खात्यावर वर्ग करण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर विचारून महिला हॅकरने भारत पेट्रोलियमच्या एरिया व्यवस्थापकाला एक लाख पाच हजार रुपयांचा आॅनलाईन गंडा घातला. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात संशयित मेहेक शर्मा (रा. बेगमपेठ, हैदराबाद) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी सांगितले, फिर्यादी मनोज गोवर्धन गुप्ता (वय २९, रा. नक्षत्र हाईट्स, शिवाजी पार्क, कोल्हापूर) हे मूळचे मध्यप्रदेशातील उज्जैन येथील रहिवासी आहेत. भारत पेट्रोलियमचे कोल्हापूर जिल्ह्याचे एरिया व्यवस्थापक म्हणून ते काम करतात. १८ जूनला ते कसबा बावडा रोडवरील पोलिसांच्या पेट्रोल पंपाकडे निघाले होते. त्यावेळी त्यांना मोबाईलवर महिलेचा फोन आला.
एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असून तुमच्याकडे असलेल्या कार्डवर चार हजार पॉइंट जमा झाले आहेत. ते तुम्हाला वापरता यावेत त्यासाठी खात्यावर वर्ग करायचे आहेत, असे सांगून सर्व माहिती विचारून घेतली. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर विचारून घेतला.
गुप्ता यांना मोबाईलवर बोलण्यात गुंतवून सुरुवातीला चार हजार ९९८ व त्यानंतर दोन वेळा सात हजार ९९९, पुन्हा ६७ हजार ५०० व १६ हजार ८०० असे सुमारे एक लाख पाच हजार रुपये आॅनलाईन काढून घेतले. गुप्ता यांना खात्यावरील पैसे वजा झाल्याचे संदेश मोबाईलवर येऊ लागल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी शर्मा हिला विचारणा केली असता ‘तुमचा क्रेडिट कार्ड नंबर रद्द झाला असून नवीन नंबर देऊन त्यावर पैसे जमा होतील,’ असे सांगून एका वरिष्ठाशी बोलणे करून दिले. फसवणुकीची खात्री झाल्यानंतर गुप्ता यांनी पोलिसांत धाव घेतली.में इंटेलिजंट हूॅँ!...गुप्ता यांना फोनवर बोलण्यात गुंतवून ठेवले होते. त्यांच्याकडून पाच वेळा ओटीपी नंबर विचारून घेत पैसे काढल्यानंतर ‘मैं आप से जादा स्मार्ट हूॅँ, आपसे जादा इंटेलिजंट हूॅँ, इसलिए आप से मैंने ओटीपी जान लिए तुम्हारे पैसे निकाले है...’ असे बोलून मेहेक शर्मा हिने फोन बंद केला. हे ऐकून गुप्ता भांबावून गेले. त्यांना काहीच सुचेना. शेवटी त्यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली.