कोल्हापूर : तीन-चार तास रांगेत उभे राहून देखील कोरोना प्रतिबंधात्मक लस न मिळाल्याने नागरिक आणि लसीकरण केंद्रावरील कर्मचारी यांच्यात सोमवारी मोठी वादावादी झाली. हा प्रकार शिवाजी पेठेतील फिरंगाई हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्रावर घडला. वाद घालूनही काही उपयोग झाला नसल्याने नागरिकांना संताप व्यक्त करून घरी जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडे जिल्हा परिषदेकडून कोरोना प्रतिबंधात्मक लस पुरवली जात आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने अनेक ठिकाणी शंभर ते दोनशे नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. प्रत्यक्षात दोनशेहून अधिक नागरिक रांगेत उभे राहत आहेत. त्यामुळे सर्वांना लस देणे प्रशासनाला सुद्धा अशक्य झाले आहे. त्यामुळे वादावादीचे प्रकार घडत आहेत.
शिवाजी पेठेतील फिरंगाई हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्रावर सोमवारी सकाळी मोठ्या संख्येने नागरिक लस घेण्याकरिता रांगेत उभे होते. काही नागरिक तर सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत होते. सकाळी नऊ वाजता लसीकरण केंद्रातील कर्मचारी आले. त्यांनी गर्दी पाहिली आणि गोंधळून गेले. आज लसीकरण बंद आहे, असे जेव्हा कर्मचाऱ्यांनी सांगितले तेव्हा नागरिकांचा रागाचा पारा भलताच चढला. लसीकरण केंद्र बंद राहणार आहे याची कोणतीही सूचना तुम्ही दिली नाही, आम्ही सकाळपासून रांगेत उभे आहोत, असे सांगत नागरिकांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
परंतु, वाद घालून लस मिळणार नसल्याचे लक्षात येताच नागरिकांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध व संताप व्यक्त केला. लस केव्हा मिळेल हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही कळत नाही, त्यामुळे त्यांनासुद्धा लसीकरण केंद्र सोमवारी बंद राहणार असल्याची पूर्वकल्पना देता आली नाही. त्यातून हा प्रकार घडला.
(फोटो मिळाल्यास पाठवित आहे.)