कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार व जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांच्यामध्ये बुधवारी संध्याकाळी शासकीय विश्रामगृह परिसरात वादावादी झाली. यावेळी एकेरी भाषेचाही वापर करण्यात आला. स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास यांनी अखेर हस्तक्षेप करत दोघांना बाजूला केले.सीमाप्रश्नांबाबत भूमिका मांडण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील, आमदार, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर नेते येथून बाहेर पडले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, आदिल फरास, जयकुमार शिंदे, राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी महेंद्र चव्हाण हे थांबले होते. त्याचवेळी अनिल साळोखे हे सुद्धा परिसरातच होते. आर. के. पोवार व अनिल साळोखे हे आमनेसामने आल्यानंतर महाविकास आघाडीच्या या बैठकीच्या निमंत्रण देण्यावरून वादाची ठिणगी पडली. दोघांनीही ही जबाबदारी तुमची आहे, असे सांगून एकमेकांकडे बोट दाखविले. शब्दाला शब्द वाढत गेल्याने आवाजही वाढत एकेरी भाषेमध्येही एकमेकांना दूषणे देण्यात आली. अखेर आदिल फरास यांनी दोघांनाही बाजूला केले.
कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादावादी, एकेरी भाषेचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 7:05 PM