कोल्हापूर : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी गेलेले भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव आणि विखे पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी यांच्यात निवेदन देण्यावरून मंगळवारी दुपारी वाद झाला. त्यामुळे निवेदन न देताच जाधव हाॅटेलवरून बाहेर पडले.विखे पाटील यांना भेटण्यासाठी भाजपचे शिष्टमंडळ जाण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार जाधव आणि त्यांचे सहकारी कार्यकर्ते हॉटेलवर गेले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याबाबतीतील तक्रारीचे निवेदन घेऊन ही मंडळी गेली होती. परंतु मंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांना या सर्वांना खालीच थांबा. साहेब खाली आल्यानंतर निवेदन घेतील, असे सांगितले. यावरून जाधव आणि त्यांच्यात वाद झाला. निवेदन न देताच जाधव तेथून बाहेर पडले.नंतर थोड्या वेळाने त्या अधिकाऱ्याने जाधव यांना फोन करून पुन्हा येण्याची विनंती केली. तेव्हा जाधव यांनी पुन्हा जाण्यास नकार दिला. दरम्यान, मंत्री विखे पाटील यांनीही जाधव यांच्याशी फोनवरून बोलून आपल्यापर्यंत नीट निरोप आला नसल्याचे सांगितले. या प्रकाराची चर्चा मात्र दुपारनंतर भाजपमध्ये सुरू झाली. याबाबत विजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गैरसमजातून हा प्रकार घडला. नंतर मंत्री पाटील यांनी आपल्याशी संपर्क साधला होता.
कोल्हापुरात महसूलमंत्री विखेंचे ओएसडी अन् भाजप जिल्हाध्यक्षांमध्ये निवेदनावरुन वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 12:08 PM