कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाबाहेरील चप्पल स्टँडचे अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी हटवले. यावेळी चप्पल स्टँडधारक कुटुंबातील महिला-पुरुषांच्या विरोधामुळे त्यांच्यात व पोलिसांमध्ये झटापट झाली. कारवाईत अडथळा आणत असलेल्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मंदिराच्या दारात सुमारे दीड तास हा गोंधळ सुरू होता.अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाबाहेरील दगडी संरक्षक भिंतीला लागून गणेश पाखरे, जीवन पाखरे व प्रकाश कोरवी या एकाच कुटुंबातील चार चप्पल स्टँड येथे होते. पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेने त्यांना अतिक्रमण हटवण्यास सांगितले होते. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. मंदिराची सुरक्षा व भिंतीचे पुरातन सौंदर्याला बाधा या कारणावरून भिंतीला लागून असलेले चप्पल स्टँड हटविण्याची मागणी गेले काही महिने होत होती. अखेर मंगळवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान अतिक्रमण विभागाचे प्रमुख सचिन जाधव यांचे पथक दक्षिण दरवाजाबाहेरील बेकायदेशीर चप्पल स्टँड हटवण्यास आले. पथक येताच कुटुंबाने विरोधाला सुरुवात केली. यात महिलांची संख्या जास्त होती. स्टँडच्या समोर उभे राहून त्यांनी प्रशासनाच्या नावाने शंख केला. काढलेल्या साहित्यावर बसून कारवाईत अडथळा आणत होत्या, मात्र जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेतले. महापालिकेच्या पथकाने जेसीबी, डंपरच्या साह्याने स्टँड हलवून विरोध मोडून काढत कारवाई पूर्ण केली. या तणावपूर्ण वातावरणामुळे परस्थ भाविक काही काळ गोंधळले होते तर बघ्यांचीही मोठी गर्दी होती.
प्रशासनाच्या नावाने बोंबयावेळी महिलांनी प्रशासनाच्या नावाने बोंब मारत व स्वत:चे डोके आपटून घेऊन कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला. सुमारे तासाभराहून अधिक काळ महापालिका अधिकारी, कर्मचारी, पोलिसांसोबत वाद सुरू होता.