कोल्हापूर : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे खूनखटल्यातील अंतिम युक्तिवाद शुक्रवारी संपला. फिर्यादी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी लेखी युक्तिवाद सादर केला. आता खटला न्याय निर्णयासाठी ठेवला आहे. पुढील सुनावणी १३ डिसेंबरला होत आहे. मूळचे कोल्हापूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर हे या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आहेत.पनवेल सत्र न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पलदेवार यांच्यासमोर लेखी युक्तिवाद मांडला. यापूर्वीच दोन्ही बाजूचे तोंडी युक्तिवाद पूर्ण होऊन वरिष्ठ न्यायालयाचे या खटल्याला गरजेचे असलेले सर्व जजमेंटही हजर केले गेले आहेत. आठ वर्षांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर शुक्रवारी बिंद्रे खून खटला न्याय निर्णयासाठी ठेवला आहे.
बिद्रे-गोरे यांचे अपहरण झाल्याची फिर्याद मुंबईतील कळंबोली पोलिस ठाण्यात दाखल होऊन आठ वर्षे झाली. गुन्हा दाखल करण्यापासून ते तपास आणि न्यायालयीन कामकाजासाठी बिद्रे-गोरे कुटुंबीयांना सातत्याने पाठपुरावा करावा लागला. पनवेल न्यायालयात यु्क्तिवादाची प्रक्रिया संपली असून आता १३ डिसेंबरला पुढील सुनावणी होत आहे.
२०१५ मध्ये अपहरणआळते (ता. हातकणंगले) येथील अश्विनी बिद्रे-गोरे यांचे कळंबोली येथून २०१५ मध्ये अपहरण झाले होते. शोध घेऊनही त्या सापडत नसल्याने अखेर त्यांचे पती राजू गोरे यांनी पत्नी बेपत्ता असल्याची फिर्याद पोलिसांत दिली होती. पोलिसांनी तपास करण्यास चालढकल केल्याने गोरे यांनी ऑक्टोबर २०१६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली. त्यानंतर या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी नेमली.