कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परिपूर्ण आणि ‘नॅक’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयार केलेला स्वयंअध्ययन अहवाल नॅक, बंगलोर येथे गेल्या बुधवारी (दि. ७) सादर करण्यात आला आहे, अशी माहिती विद्यापीठाचे ‘बीसीयुडी’ संचालक प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे यांनी दिली. ‘नॅक’ला भेट देणार्या शिष्टमंडळात डॉ. राजगे यांच्यासह विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. व्ही. बी. जुगळे, व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. डी. आर. मोरे, सहायक कुलसचिव व्ही. जे. ढेरे, एम. जे. पाटील, धैर्यशील यादव, आदींचा समावेश होता. राजगे म्हणाले, ‘नॅक’ला स्वयंअध्ययन अहवाल सादर करण्याच्या मुदतीच्या दोन दिवस आधीच विद्यापीठाचा अहवाल सादर केला. ‘नॅक’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि निकषांबरहुकूम अहवाल सादर केला आहे. १९५ पानांचा स्वयंअध्ययन अहवाल आणि त्याला पूरक म्हणून सर्व विभागांचा एकत्रित ७७४ पानांचा मूल्यमापन अहवाल (इव्हॅल्युएशन रिपोर्ट) प्रत्येकी दहा प्रतींत सादर केला. दक्षता म्हणून आम्ही जाताना सर्व आवश्यक ती पूरक कागदपत्रे सोबत नेली होती. अहवालासह ‘नॅक’च्या पीअर टीम भेटीसाठी आॅगस्ट-२०१४ मधील तीन टप्पे (स्लॉट्स) सुचविले आहेत. त्यापैकी एका टप्प्यात ‘नॅक’ची चार ते पाच सदस्यांची पीअर टीम विद्यापीठाला भेट देऊन पाहणी करेल. विद्यापीठाचा स्वयंअध्ययन अहवाल दि. १० एप्रिलपासून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ठेवला होता. त्यावर सूचना व दुरुस्त्या मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार अहवालाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी साधारण दोन आठवडे सलगपणे या अहवालात आवश्यक त्या दुरुस्त्या व सुधारणा करण्यात येऊन अहवाल अधिकाधिक निर्दोष करण्याचा विद्यापीठ प्रशासनाने कसोशीने प्रयत्न केल्याचेही डॉ. राजगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विद्यापीठाचा स्वयंअध्ययन अहवाल ‘नॅक’ला सादर अर्जुन राजगे : पीअर टीम भेटीसाठी आॅगस्टमधील तीन टप्पे सुचविले
By admin | Published: May 12, 2014 12:32 AM