कोल्हापूर : नवरात्रौत्सवात दोन मंडळांत काही दिवस धुमसणाऱ्या वादाला उग्र रूप आले आणि सात-आठ जणांच्या सशस्त्र गटाने दौलतनगर, तीन बत्ती चौकातील सुमारे आठ-दहा घरांवर तुफान दगडफेक करून पेट्रोल टाकून वाहने जाळण्याचा व तोडफोडीचा प्रकार घडला.
यामुळे दौलतनगर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधून बुधवारी (दि. ९) पहाटेच्या सुमारास हे कृत्य केले. या हल्ल्यात सहा दुचाकी जाळल्या, तर दोन मोटारींची तोडफोड करण्यात आली.प्रकरणी पोलिसांनी महेश चंद्रकांत दिंडलकुप्पे ऊर्फ पप्या (वय ३०, रा. आर. के. तरुण मंडळाशेजारी, दौलतनगर) याच्यासह आणखी तीन अज्ञातांवर गुन्हे नोंदविले आहे.पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राजारामपुरी दौलतनगरातील तीन बत्ती चौकात आर.के. गु्रप आणि विशाल क्रीडा मंडळ या दोन मंडळांत गेली अनेक वर्षे वाद सुरू आहे. त्यातून एकमेकांच्या घरांवर हल्ला करण्याचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत.नवरात्रौत्सवात आर. के. गु्रप आणि विशाल क्रीडा मंडळ या दोन मंडळांतील कार्यकर्त्यांत काही दिवस वाद धुमसत होता. मंगळवारी रात्री दोन्हीही मंडळांच्या कार्यकर्त्यांत किरकोळ वादावादी झाली. त्यातून बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास या वादाने उग्र रूप धारण केले. सात ते आठ जणांच्या सशस्त्र गटाने तोंडाला रुमाल गुंडाळून तीन बत्ती चौकातील आठ-ते दहा घरांवर बाटल्या, दगडफेक करीत दहशत माजवली. तसेच त्यांनी रस्त्याकडेला उभा केलेल्या सहा दुचाकी वाहनांवर पेट्रोल टाकून जाळल्या, दोन मोटारी व एका रिक्षाची तोडफोड केली.दगडफेकीच्या आवाजाने परिसरातील नागरिक जागे झाले. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता अनेक दुचाकी वाहने पेटविली होती. नागरिकांनी तातडीने पेटलेली वाहने विझवली. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले. या प्रकरणी सुरेश वसंतराव चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसाार महेश चंद्रकांत दिंडलकप्पे उर्फ पप्या (वय ३०, रा. आर. के. तरुण मंडळाशेजारी, दौलतनगर) यांच्यासह आणखी तीन अज्ञातांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी या भागात फिरती करून जुजबी कारवाई केल्याची चर्चा आहे.वाहनांचे नुकसानधोंडीराम गंगाराम चव्हाण (एमएच ०९, सीडब्ल्यू ७४५५), सुरेश वसंतराव चव्हाण (एमएच ०९, सीएस ३५२२), आदी दुचाकी वाहने पेट्रोल टाकून पेटविली. शिवाय सागर पांडुरंग साळवी (एमएच ०९, बीसी १४७९) मिनी टेम्पो, विशाल बसवंत मेलगडी (एमएच ०९, एएच ४०५२) या मोटारीवर दगड घालून त्याची तोडफोड केली.विनयभंगाच्या तक्रारीच्या रागातून हल्लासोमवारी (दि. ७) रात्री दौलतनगरातील तीन बत्ती चौकात विशाल क्रीडा मंडळाशेजारी जयदुर्गा महिला मंडळाच्या महिला दांडिया खेळत होत्या. यावेळी आर. के.ग्रुपच्या काही कार्यकर्त्यांनी तेथे येऊन खेळणाऱ्या महिलांच्या अंगावर खडे मारून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यावेळी परिसरात राहणारे तानाजी शेळके यांनी त्या कार्यकर्त्यांना ताकीद दिली. त्यांपैकी आठ महिलांनी दुसऱ्या दिवशी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
त्यानुसार महेश दिंडुलकुप्पे, अतीश चव्हाण, अनिकेत धोत्रे, विशाल गाडीवर, राहुल कलगुटकी, शुभम गाडीवर, प्रकाश मळगेकर (सर्व रा. तीन बत्ती चौक, दौलतनगर, राजारामपुरी) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रात्री उशिरा चौघांना ताब्यात घेतले आहे. ही तक्रार दिल्याचा राग उफाळून तरुणांच्या गटाने दगडफेक, तोडफोड व वाहने जाळपोळ केल्याचे बोलले जाते.