कोल्हापूर : मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील संभाजीनगर येथील घरासमोर पोलिसांनी सशस्त्र बंदोबस्त तैनात केला आहे. नागाळा पार्क येथील भाजप कार्यालयाच्याही सुरक्षेसाठी पोलिस तैनात केले आहेत. त्यामुळे मंत्री पाटील यांचे घर आणि भाजपच्या कार्यालयाला पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे.मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने आंदोलक आक्रमक बनले आहेत. राज्यात ठिकठिकाणी मंत्री आणि आमदारांची घरे, कार्यालये आंदोलकांकडून लक्ष्य केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी खबरदारी घेतली असून, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर आणि भाजपच्या कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी बंदोबस्त तैनात केला. पोलिसांसह शीघ्र कृती दलाच्या तुकडीचाही यात समावेश आहे, त्यामुळे पोलिस छावणीचे स्वरुप आले आहे. अन्य आमदार आणि खासदारांना गरजेनुसार बंदोबस्त पुरवला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातील घरासमोर पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त
By उद्धव गोडसे | Published: October 31, 2023 12:11 PM