किणी : वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील सराफाच्या घरावर बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. यावेळी पाच ते सहा दरोडेखोरांनी सुभाष सदाशिव देशमुख (वय ४८) यांच्या गळ्यास धारदार शस्त्र लावून सात तोळे सोने व दहा हजारांची रोकड लंपास केली. प्रतिकार करणाऱ्या देशमुख यांच्यासह त्यांच्या घरातील तीन महिलांना दरोडेखोरांनी बांधून मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली असून, परिसरात नाकेबंदी केली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, वाठार तर्फ वडगाव येथील सुभाष देशमुख यांचे सराफी दुकान आहे. ते रात्री साडेआठच्या सुमारास गावाबाहेर असलेल्या घरी आले. यावेळी त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या पाच ते सहा दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून घरात प्रवेश केला. यावेळी देशमुख यांच्या गळ्यास धारदार शस्त्र लावले. त्यांनी प्रतिकार करताना झालेल्या झटापटीत ते जखमी झाले. चोरट्यांनी चार ते पाच खोल्यांमधील साहित्य विस्कटून टाकले, तर घरातील प्रभा देशमुख, बाळाबाई देशमुख व अन्य एका महिलेला (नाव समजू शकले नाही) मारहाण करून दोरीच्या साहाय्याने बांधून ठेवले. दरोडेखोरांनी सर्वांचे मोबाईल काढून घेतले होते. देशमुख यांच्याकडे यावेळी पाच लाख रुपयांची मागणी केली. त्याचवेळी त्यांचा मुलगा व मुलगीची चौकशी केली. जवळजवळ एक तास दरोडेखोर देशमुख यांच्या घरात होते. घरात सापडलेले सात तोळे दागिने व दहा हजार रुपयांची रोकड घेवून दरोडेखोरांनी गाडीतून पलायन केले. सर्वांचे मोबाईल काढून घेतल्यामुळे देशमुख यांना बाहेरच्या लोकांशी संपर्क साधता आला नाही. दरोडेखोर निघून गेल्यानंतर देशमुख यांनी रस्त्यावर येऊ न दरोड्याची माहिती नागरिकांना दिली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी एकत्र आले. घटनेची माहिती मिळताच वडगावचे पोलिस निरीक्षक संजीव पाटील व पोलिस उपाधीक्षक ए. एम. मकानदार यांनी घटनास्थळी भेट दिली. कोल्हापूरहून श्वानपथक मागविण्यात आले होते. सुझी श्वान देशमुखांच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत माग काढत गेले व तिथेच घुटमळले. रात्री उशिरापर्यंत शोधमोहिम सुरु होती.