कोल्हापूर : भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये युतीसाठी जरी चर्चा सुरू असली, तरी प्रत्यक्षात मात्र दोन्ही पक्षांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. याचे प्रत्यंतर गुरुवारी आले.एकीकडे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी बोलावलेल्या संवाद मेळाव्यामध्ये त्यांनी आपले पुतणे ॠतुराज पाटील यांची ‘दक्षिण’मधून उमेदवारी जाहीर केली. ते काँग्रेसमधूनच लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले; मात्र यावेळी शिवसेना खासदार संजय मंडलिक यांची असलेली उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. लोकसभेला मंडलिक यांना सतेज पाटील यांनी जी मदत केली, त्याची परतफेड होणार असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट करणारे ठरले. हा भाजपला धोक्याचा इशारा मानला जातो.दुसरीकडे सत्तेत घटक पक्ष असलेल्या विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांना दोन महामंडळांचे उपाध्यक्षपदही गुरुवारी जाहीर करण्यात आले. पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांच्याविरोधात विनय कोरे निवडणूक लढविणार असून, त्यांना बळ देण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. युती तुटलीच तर हा मतदारसंघ जनसुराज्यसाठीच सोडला जाणार हेदेखील सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे; त्यामुळेच एकूणच कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण पाहता युती तुटलीच तरच्या सर्व जोडण्या ज्यांनी त्यांनी घातल्याचे स्पष्ट होत आहे; त्यामुळेच धनंजय महाडिक यांच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने अमल महाडिक यांनी त्यांच्यासाठी काम केले, त्याच पद्धतीने आता संजय मंडलिक हे ॠतुराज पाटील यांच्या पाठीशी राहणार असल्याचा संदेश संवाद मेळाव्यातून देण्यात आला आहे.दुसरीकडे गुरुवारीच भाजपने आपले नवे पदाधिकारी जाहीर केले असून, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले धनंजय महाडिक यांना राज्य उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. महाडिक आणि मंडलिक हे लोकसभा निवडणूक एकमेकांविरोधात लढले होते.
सेना-भाजपात ‘शीतयुद्ध’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 12:44 AM