लाेकमत न्यूज नेटवर्कलेह/नवी दिल्ली : लडाखच्या तुरतुक सेक्टरमध्ये जवानांना नेणारी लष्कराची बस नदीमध्ये काेसळून झालेल्या अपघातात ७ जवानांचा मृत्यू झाला असून, १९ जवान जखमी झाले आहेत. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, २६ जवानांची तुकडी परतापूर येथून लेहमध्ये हनीफ सबसेक्टरच्या फाॅरवर्ड पाेस्टवर जात हाेती. थाेइसेपासून २५ किलाेमीटर अंतरावर सकाळी अपघात झाला. जवानांना नेणारी बस अनियंत्रित झाली आणि श्याेक नदीत सुमारे ५० ते ६० फूट खाेल काेसळली. सर्व २६ जवानांना बाहेर काढून परतापूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना ७ जवानांची प्राणज्याेत मालवली. तर, १९ जखमी जवानांना हरयाणात हलविले.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी जवानांच्या अपघाती मृत्यूंबद्दल दु:ख व्यक्त केले. जखमी जवान लवकर बरे हाेतील, अशी प्रार्थना करुन सर्व प्रभावितांना सर्वताेपरी मदत करण्यात येईल, असे ट्वीट त्यांनी केले. लाेकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही या घटनेबद्दल शाेक संवेदना व्यक्त केल्या.
गडहिंग्लजवर शोककळा या अपघातात गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे येथील प्रशांत शिवाजी जाधव (२७) या जवानाचा मृत्यू झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण एस. एम. हायस्कूलमध्ये, तर उच्च माध्यमिक शिक्षण जागृती प्रशालेत झाले. त्यांचे वडीलही सैन्यदलातून सेवानिवृत्त आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, तीन बहिणी, असा परिवार आहे. जानेवारी २०२० मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांना एक वर्षाची मुलगी आहे. घरातील एकुलत्या कर्त्या मुलाच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्रशांत जाधव यांचे पार्थिव विमानाने बेळगाव येथे आणले जाईल. तेथून सैन्यदलाच्या वाहनातून जन्मगावी आणण्यात येईल व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.