कोल्हापूर : सूर्याभोवती इंद्रधनुष्याच्या प्रभा मंडलाचे रिंगण (हेलो) झालेल्या खगोलशास्त्रीय घटनेचे बुधवारी (दि. १) कोल्हापूरकरांना दर्शन घडले. कोल्हापूरमध्ये सकाळी साडेअकरा ते दुपारी सव्वाएकपर्यंत हेलो दिसला.याबाबत विवेकानंद महाविद्यालयातील पदार्थविज्ञान व खगोलशास्त्र विभागप्रमुख मिलिंद कारंजकर यांनी सांगितले की, आकाशामध्ये उंचावर सुमारे २० हजार फुटांवर ‘सीरस’ नावाचे ढग तयार होतात. या ढगांमध्ये लाखोंच्या संख्येने लहान-लहान बर्फाचे क्रिस्टल्स असतात. त्यामधून सूर्याची किरणे २२ अंशांच्या कोनातून गेल्यानंतर रिफ्लेक्शन अथवा रिफ्रॅक्शन अथवा त्यांचे स्पिल्टिंग आॅफ लाईट होते; त्यामुळे सूर्याभोवती ‘हेलो’ दिसतो.
कोल्हापुरात बुधवारी सूर्याभोवती इंद्रधनुष्याच्या प्रभा मंडलाचे रिंगण (हेलो) झालेल्या खगोलशास्त्रीय घटनेचे दर्शन घडले. (छाया : नसीर अत्तार)
त्याला २२ अंश हेलो असे म्हटले जाते; कारण, सूर्याभोवती जो गोल तयार होतो. त्या गोलची त्रिज्या ही २२ अंश इतकी असते. त्यातील गोलाच्या आतील बाजूस लाल रंग, तर बाहेरील बाजूस निळा रंग दिसतो; कारण, हे दोन्ही रंग डोळ्याला अधिक संवेदनशील असतात.
दरम्यान, सकाळी साडेअकरा वाजल्यापासून सूर्याभोवतीचा हेलो दिसू लागला. दुपारी सव्वाएकपर्यंत तो स्पष्ट दिसत होता. त्यानंतर त्याचे दिसणे कमी झाले. या खगोलशास्त्रीय घटनेची कोल्हापूरमध्ये अनेकांनी आपल्या स्मार्टफोनवर छायाचित्रे टिपली, व्हिडिओ केले. दिवसभर सोशल मीडियावर ही छायाचित्रे, व्हिडिओ फिरत राहिली. काहींनी हेलोबाबतची माहिती शेअर केली.
ढग आले की, तेजोवलय दिसतेया हेलोला सूर्याचे तेजोवलय देखील म्हटले जाते. ते वर्षाच्या कोणत्याही ऋतुमध्ये दिसू शकते; त्यासाठी केवळ पावसाळाच असणे आवश्यक नाही. केवळ ढग आले की, हे तेजोवलय त्या भागात दिसते. कोल्हापुरात बुधवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी सव्वाएकपर्यंत ते दिसले. या तेजोवलयामुळे शहरातील वातावरणात दुपारनंतर थंड झाले, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक राजीव व्हटकर यांनी दिली.
कोल्हापुरात बुधवारी सूर्याभोवती इंद्रधनुष्याच्या प्रभा मंडलाचे रिंगण (हेलो) झालेल्या खगोलशास्त्रीय घटनेचे दर्शन घडले. (छाया : नसीर अत्तार)
‘झिरो शॅडो डे’ सोमवारीकोल्हापुरात सोमवारी (दि. ६) ‘झिरो शॅडो डे’ (शून्य सावली दिवस) आहे. त्या दिवशी दुपारी १२ वाजून २९ मिनिटांपासून ५२ सेकंदांपर्यंत सावली नाहीशी होणार आहे. सोमवारनंतर विविध दिवशी महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या ठिकाणी शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. कोल्हापुरात पुन्हा दि. ६ आॅगस्ट रोजी शून्य सावली दिवस होणार असल्याची माहिती प्रा. कारंजकर यांनी दिली.