गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यात सौम्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक आहे.त्यामुळे त्यांच्या संस्थात्मक अलगीकरणाची व्यवस्था गावपातळीवरच करावी,असे आवाहन गटविकास अधिकारी शरद मगर यांनी केले.पंचायत समितीच्या मासिक सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती रुपाली कांबळे होत्या. कोरोनामुळे ही सभा अॉनलाईन पध्दतीने झाली. जिल्हयातील अन्य तालुक्यात रूग्ण संख्या कमी होत असताना गडहिंग्लज तालुक्यातील रूग्ण का वाढत आहे?असा मुद्दा विठ्ठल पाटील यांनी उपस्थित केला.त्यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांनी सविस्तर खुलासा केला.मगर म्हणाले, अॅण्टीजेन व आरटीपीसीआर चाचण्या तालुक्यात वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे सौम्य लक्षणे असणारेदेखील बाधितांच्या यादीत समाविष्ट झाल्यामुळेच आपल्या तालुक्यातील रुग्णांची संख्या अधिक दिसत आहे.
विजयराव पाटील म्हणाले,ठिबक सिंचनासाठी अर्ज भरण्यापासून सर्व प्रक्रीया ऑनलाइन आहे. लाभार्थींची निवड सुध्दा ऑनलाइन सोडतीमधूनच होते. परंतु, ग्रामीण शेतकर्यांना ही प्रक्रिया समजत नाही. त्यामुळे गरजू शेतकरी वंचित राहतात. त्यासाठी प्रक्रियेत लवचिकता आणावी.श्रीया कोणकेरी म्हणाल्या, जरळी बंधारा व भडगाव पुलाच्या दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे.जयश्री तेली म्हणाल्या, कृषीसेवक माहिती देत नसल्याच्या शेतकर्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कृषीसेवकांनी शासनाच्या कृषी योजना व उपक्रमांची माहिती प्रत्येक शेतकर्यापर्यंत पोहचेल याची दक्षता घ्यावी.बनश्री चौगुले म्हणाल्या, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मलेरिया, डेंग्यू व अन्य साथींच्या आजारांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी.सभेला उपसभापती इराप्पा हसुरी, इंदूमती नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते.११ वीची प्रवेशपरीक्षा ऐच्छिक११ वी प्रवेशासाठी यावर्षी शासनाने ऐच्छिक प्रवेश परीक्षेचे नियोजन केले आहे.त्याकरिता १०० गुणांचे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. जे विद्यार्थी ही परीक्षा देणार नाहीत, त्यांना दहावीचे गुण आणि अंतर्गत मूल्यमापन गुणांच्या आधारे प्राधान्यक्रमाने प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हलबागोळ यांनी दिली.१४,४४५ नागरिकांची तपासणीगडहिंग्लज तालुक्यात १० जूनअखेर १४ हजार ४४५ लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी ७६५२ जणांची आरटीपीसीआर तर ६७९३ जणांची अॅण्टीजेन तपासणी केली आहे.त्यामुळेच बाधितांची संख्या अधिक दिसत असून सध्या ५९८ रुग्ण उपचार घेत आहेत,असेही गटविकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.