कोल्हापूर : मोठ्या गावाच्या ठिकाणी स्वॅब घेण्याची सोय करावी, गेल्यावर्षीची सर्व कोविड काळजी केंद्रे सुरू करावीत, नवीन केंद्राबाबतही पाहणी करावी, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड प्रयोगशाळेची तपासणीची क्षमता वाढवणे व गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय येथील ऑक्सिजन रिफिलींग क्षमता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
मंत्री पाटील म्हणाले, ‘‘संशयिताचा स्वॅब घेतल्यानंतर त्याचा अहवाल येईपर्यंत जर त्यांच्या घरी स्वतंत्र व्यवस्था नसेल तर, त्यास अलगीकरण कक्षात ठेवावे. प्रत्येक कोविड काळजी केंद्रात स्वॅब घेण्याची सोय करावी आणि त्यासाठी वेळ निश्चित करावी. ज्या तालुक्यात जास्त रूग्ण सापडत आहेत त्या ठिकाणी उपाययोजना राबविण्याबाबत लक्ष केंद्रित करावे.’’
जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, ‘‘कोल्हापूरसाठी १००, गडहिंग्लजसाठी ५० व आणि इचलकरंजी येथील आयजीएमसाठी जम्बो ऑक्सिजन सिलिंडर भरून राखीव ठेवावेत. ऑक्सिजन कॉन्संट्रेटर खरेदी करण्याबाबत प्रस्ताव पाठवावा. सध्या १५ कोविड काळजी केंद्र सुरू असून, गतवर्षीची सर्व केंद्रे टप्प्याटप्प्याने सुरू करावीत, नवीन केंद्रांसाठीची तयारी पूर्ण करावी. लवकरच डॅश बोर्ड आणि नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येईल.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, डॉ. उत्तम मदने, अधीक्षक अभियंता व्ही.ए.गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे उपस्थित होते.
--
मुरगूड, मलकापूरला ऑक्सिजन लाईन..
मुरगूड, गडहिंग्लज, राधानगरी, चंदगड, मलकापूर याठिकाणी ऑक्सिजन लाइन करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा. सी.पी.आर.मधील नादुरुस्त असलेले व्हेंटिलेटर्स दुरुस्त करण्याबाबत तातडीने यंत्रणा राबवावी, असे पालकमंत्र्यांनी बजावले.
फोटो नं १७०४२०२१-कोल-कोरोना आढावा बैठक
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी विविध यंत्रणांना सूचना दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.
--