कोल्हापूर : सकाळी उठल्याउठल्या फिरायला जाणाऱ्यांची संख्या आता वेगाने वाढली आहे. कोरोनानंतर तर आरोग्याबाबत जागरूक झालेले अनेक नागरिक फिरताना दिसत आहेत. या नागरिकांच्या आरोग्यविषयक प्रचंड आस्थेपोटी चक्क स्मशानभूमीशेजारीच मार्निंग वॉक करण्यासाठी जागा विकसित करण्याचे पुण्यकर्म या करवीरनगरीत घडले आहे.
शहरातील कदमवाडी स्मशानभूमीजवळ चक्क असा पाथ तयार करण्यात आला आहे. तत्कालीन आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून ४२१७ नगरविकास निधीमधून या कामासाठी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले. एखाद्या प्रभागात विकासकामे करताना किमान तेथे काय केले जाणार आहे, याची माहिती लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी घेण्याची गरज आहे.मात्र यातील काही न झाल्याने चक्क स्माशनभूमीशेजारी मॉर्निंग वॉकसाठी पेव्हिंग ब्लॉकचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. मुळात स्मशानात आल्यानंतर नागरिक अंत्यसंस्कार करण्यासाठी थांबतील, की येथे फिरण्यासाठी येतील? याचा विचार हे काम मंजूर करताना केला गेला नाही. वाट्टेल तसा निधी खर्च करण्याचा हा एक प्रकार आहे.
पेव्हिंग ब्लॉक जरी घातले असले तरी, येथे कुणीच फिरायला येत नसल्याने येथे अस्वच्छता आहे. कुणीतरी येथे रिकामी फाटकी खोकी आणून टाकली आहेत. त्यामुळे फिरायचे बाजूलाच राहू द्या, येथे उभारायला सुध्दा कोणी तयार होणार नाही, अशी वस्तुस्थिती आहे. शासकीय निधीची ही उधळपट्टी थांबण्याची गरज आहे.खुल्या जागेवर आडवे-तिडवे पेव्हिंग ब्लॉक्सएखाद्या मैदानाचा अयोग्य वापर कसा करावा, याचे एक उत्तम उदाहरण संयुक्त महाराष्ट्र हौसिंग सोसायटीच्या खुल्या जागेचे देता येईल. या ठिकाणी मैदानाच्या कडेने चारही बाजूंनी पदपथ तयार करण्याऐवजी मैदानातून आडवे-तिडवे पेव्हिंग ब्लॉक्स घालण्यात आले आहेत. या ठिकाणी मुले क्रिकेट खेळत असल्याने काचा फुटतात, म्हणून असा प्रकार केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नेमके काम काय आणि कसे होणार आहे, याची अधिकाऱ्यांनी माहिती घेण्याची गरज आहे.