कोल्हापूर : वीजबिल माफीवरून जिल्हा आणि राज्यपातळीवर बैठकांचा जोर एका बाजूला चालू असताना, दुसरीकडे मात्र महावितरणने थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे. नोटिसा निघाल्याच्या चौथ्यादिवशी आणखी ६०८ कनेक्शन तोडण्यात आली. त्यामुळे तुटलेल्या वीज कनेक्शची संख्या २८९७ वर पोहोचली आहे.
लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची वीजबिले माफ करावीत, या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन सुरू आहे. वीज तोडण्यास येणाऱ्यांना कोल्हापुरी पायताण दाखवण्याचे, हुसकावून लावण्याचे धोरण आंदोलकांकडून एका बाजूला ठरत असताना, १ एप्रिलपासून एकही बिल न भरलेल्यांची यादी तयार करून कनेक्शन तोडण्याचा सपाटा महावितरणने लावला आहे. त्यामुळे गल्लोगल्ली वादाचे प्रसंग उमटू लागले आहेत. त्यातच कोणतीही गय न करता कनेक्शन तोडा, असे आदेश महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी कोल्हापुरात बैठक घेऊन सांगितले आहे. मार्चपर्यंत शंभर टक्के वसुलीचे उद्दिष्ट ठेवून कामाला लागा, असे आदेशच त्यांनी यंत्रणेला दिले आहेत. त्यामुळे ग्राहक आणि महावितरण दोघेही आक्रमक झाल्याने आता वीज बिल वसुलीवरुन संघर्षाचा पुन्हा भडका उडण्याची चिन्हे दिसत आहेत.