हरळी (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना सहयोग तत्त्वावर ब्रिस्क कंपनीकडे चालवायला देण्यात आला आहे. कारखान्यातून सेवानिवृत्त झालेल्या कामगारांनी थकीत फायनल पेमेंट, ग्रॅच्युईटी आणि वेतन फरकाच्या मागणीसाठी येथील प्रांत कचेरीसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान, कारखाना व कंपनीने आपापल्या कार्यकाळात निवृत्त झालेल्या कामगारांची ग्रॅच्युईटी देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, केवळ ग्रॅच्युईटी स्वीकारण्यास कामगारांनी नकार दिला आहे. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठीच त्यांनी आज प्रांताधिकाऱ्यांच्या दारात बसण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी मज्जाव केल्यामुळे कामगारांनी स्वत:हून अटक करून घेतली.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रांत कार्यालयाच्या परिसरात चोख बंदोबस्त तैनात होता. साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.