कोल्हापूर : संभाजीनगर येथील सुधाकर जोशीनगरात घरात घुसून कुटुंबावर खुनी हल्ला करणाऱ्या संशयित सचिन गायकवाड, प्रभाकर गायकवाड यांना पोलिसांकडून अटक करण्यास टाळाटाळ होत आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी परिसरातील नागरिकांनी दसरा चौकात एकत्र जमून ठिय्या आंदोलन केले. यावेळी १० जणांच्या शिष्टमंडळाने मुख्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले.सुधाकर जोशीनगरात आकाश पट्टण याच्याकडे पानपट्टीच्या व्यवहारातून १० हजार रुपये प्रतिमहिना हप्त्याची मागणी करीत सचिन गायकवाड, प्रभाकर गायकवाड, सहदेव कांबळे, संतोष गायकवाड, आंतेशकुमार या चौघांनी २३ फेब्रुवारीला त्याच्या घरात घुसून मारहाण करीत प्रापंचिक साहित्याची तोडफोड करून हातामध्ये नंग्या तलवारी नाचवीत प्रचंड दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी संतोष कमलाकर गायकवाड, सहदेव वसंत कांबळे, आंतेशकुमार गोरोबा कांबळे या तिघांना अटक केली. हल्ल्यातील म्होरके सचिन व प्रभाकर गायकवाड यांना अद्याप अटक केलेली नाही. याच्या निषेधार्थ परिसरातील नागरिक व अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे २०० कार्यकर्ते शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास दसरा चौकात एकत्र जमले. या ठिकाणी घोषणाबाजी करीत त्यांनी परिसर दणाणून सोडला. मोर्चामध्ये महिलांची संख्या मोठी होती.शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन सध्या दहावी-बारावीची परीक्षा सुरू आहे. मोर्चा काढू नका, संशयितांना तत्काळ अटक करू, तुमच्या परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधते. यापुढे कोणत्याही गुंडाचा उपद्व्याप चालू देणार नाही. तुम्हा सर्वांना सुरक्षेची हमी देते, असे भावनिक आवाहन केले. त्याला कार्यकर्त्यांनी प्रतिसाद देत, मोर्चा न काढता पाच ते दहाच लोक मुख्यलयात जाऊन पोलीस अधीक्षकांना निवेदन देतो, असे सांगितले. त्यानंतर निवेदन देऊन येईपर्यंत अन्य कार्यकर्ते दसरा चौकातील मैदानावर ठाण मांडून बसले.
यावेळी अतुल दिघे, प्रशांत वाघमारे, आकाश पट्टण, बाळासाहेब कांबळे, संजय गुदगे, उमेश सुतार, सुनीता वाघमारे, मालुबाई तुदीगाल, पुष्पा पुजारी, सविता कांबळे, पिंकी तळेकर, रेणुका कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.