लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील टाकवडे वेस परिसरात घरफोडीच्या उद्देशाने संशयितरीत्या फिरणाऱ्या एकास गावभाग पोलिसांनी रात्र गस्तीवेळी पकडले. यावेळी पोलिसांशी झालेल्या झटापटीत संशयित जखमी झाला. राजेंद्र मधुकर कोळी (वय ४०, रा. टाकवडे, ता.शिरोळ) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून मोटारसायकल व १८० रुपयांचे साहित्य असा वीस हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, लॉकडाऊन असतानाही अनेकजण विनाकारण फिरत असल्याने पोलिसांकडून गस्त घालण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. १९) रात्रीच्या सुमारास गावभाग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार हे पथकासमवेत जय सांगली नाका ते टाकवडे रोडवर गस्त घालत होते. त्यावेळी राजेंद्र कोळी हा आपल्या दुचाकी (एमएच ०९ ईव्ही ८५६६) वरून निघाला होता. संशयावरून पोलिसांनी त्याला थांबण्यास सांगितले. परंतु, कोळी हा न थांबता पुढे निघून गेला. टाकवडे गावानजीक पोलिसांनी त्याला पकडले असता तो पोलिसांशी हुज्जत घालू लागला. त्यावेळी झालेल्या झटापटीत कोळी खाली पडल्याने जखमी झाला. पोलिसांनी त्यास उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोळी हा गवंडी काम करत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून वीस हजार रुपये किमतीची मोटारसायकल, ५० रुपयांची लोखंडी हातोडी, १०० रुपयांच्या दोन छन्नी, दहा रुपयांचा लोखंडी सळईचा हूक, वीस रुपयांचा हॅक्सा ब्लेड असा वीस हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.