बोरवडे : रमेश वारके :
बोरवडे (ता. कागल) येथील लक्ष्मी तलाव परिसरात ब्लॅक हेरॉन या परदेशी हिवाळी पाहुण्यांचे आगमन झाले असून ब्रम्हदेश, बलुचिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड तसेच मध्य युरोपमध्ये आढळणाऱ्या या स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनामुळे पक्षीमित्र सुखावले आहेत. इतर पाणपक्षी व त्यापेक्षा आकाराने मोठे असलेले हे पक्षी तलावाकडे येणाऱ्या - जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ब्लॅक हेरॉन (काळा ढोक) हे पक्षी मध्य युरोपातून उत्तर भागातून भारतातील विविध भागात समूहाने येतात आणि येथून पुढे ते श्रीलंकेपर्यंत पोहोचतात. हे पक्षी थंड हवामानाच्या प्रदेशातून स्थलांतरित होतात. तसेच नद्या, सरोवरे, पाणवठे अशा प्रदेशात स्थिरावतात. थंडी कमी झाली की ते निघून जातात.
कोट -
‘अशा पक्ष्यांचे स्थलांतर होणे हे चांगल्या हवामानाचे लक्षण असून वातावरण समतोल असलेल्या भागात राहणे ते पसंत करतात. हवामानात बिघाड झाल्यास हे पक्षी स्थलांतर करत नाहीत. अन्नसाखळी बिघडली तर हे पक्षी आपली जागा बदलतात.’
- दत्ता मोरसे ( पक्षी व जैवविविधता अभ्यासक )
फोटो ओळी - बोरवडेतील तलावावर लोकांचे लक्ष वेधून घेणारा ब्लॅक हेरॉन पक्षी व इतर पाणपक्षी (छाया - सोनू फोटो, बोरवडे )