जोरदार पावसाच्या सरी झेलत राधानगरी तालुक्यातील सर्वच गावांत पारंपरिक वाद्यांच्या गजरात रविवार मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात गौराईचे घरोघरी आगमन झाले. गौराईच्या पूजनासाठी पारंपरिक वेशभूषेसह साजशृंगार केलेल्या नववधूसह माहेरवाशिणींनी नदी काठावर गर्दी केली होती. गौराईचे पूजन हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमानंतर गणेश गौराईच्या गीतांनी नदी परिसर मंजूळ स्वरांनी न्हाऊन गेला होता. त्यानंतर वाजतगाजत गौराईचे घराकडे आगमन झाले पंचारती ओवाळून घरात प्रवेश केलेल्या गौराईची श्रींच्या शेजारी प्रतिष्ठापना करण्यात आली. धूप दीप व ओवाळणीनंतर आरतीचा कार्यक्रम झाला. दरम्यान, गौराईपाठोपाठ सोमवार शंकरोबाचे आगमन होणार आहे. यासाठी घरातील महिलांची लगबग सुरू होती.
फोटो कॅप्शन : नदी घाटावर गौराई पूजनानंतर घराकडे निघालेल्या महिलांचे गुडाळ (ता. राधानगरी) येथे रमेश साबळे यांनी टिपलेले छायाचित्र.