शित्तूर-वारुण :
शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) परिसरात पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली आहे. पावसाचे पुनरागमन झाल्याने खोळंबलेल्या भात रोप लावणीला वेग आला आहे. परिसरात सगळीकडे रोप लावणीची धांदल उडाली असून शेतशिवारे माणसांच्या गर्दीने फुलली आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजास पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
शित्तूर-वारुण परिसरामध्ये भात शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते. उखळू, शित्तूर-वारुण, विरळे, जांबूर, कांडवण या परिसरात रोप पद्धतीने भाताची लावण केली जाते. यावर्षी तरव्यांची उगवण ही समाधानकारक होऊन देखील पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे परिसरातील भाताच्या रोप लावणी खोळंबल्या होत्या. आता पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केल्याने रोप लावणीस वेग आला आहे. एकाचवेळी सगळ्यांची रोप लावण सुरू असल्याने व मजुरांची कमतरता भासत असल्याने पैरा पद्धतीने रोप लावण करून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
१३ शित्तूर वारुण भातशेती
फोटो :
शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) परिसरात पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केल्याने खोळंबलेल्या रोप लावणीच्या कामांना वेग आला आहे. शेत-शिवारात बैलांच्या औताच्या सहाय्याने चिखल करताना शेतकरी (छाया : सतीश नांगरे)