- बाजीराव जठार
वाघापूर : महाराष्ट्र-कर्नाटकासह,आंध्र प्रदेश, गोवा आदी राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत सद्गुरू बाळूमामांच्या भंडारा यात्रेसाठी हजारो भाविकांच्या उपस्थित बाळूमामांच्या रथोत्सवाचे आगमन सायंकाळी झाले. आदमापूर येथे आगमन होताच महिलांनी बाळूमामांच्या १८ बग्ग्यातून आणलेल्या दुधाच्या कलशांचे औक्षण केले. हा रथोत्सव तब्बल चार तास चालला होता.या रथास ओढण्याचा मान नंदकुमार शिवळे वाल्हेकरवाडी पुणे व दत्तात्रय भोंडवे रावेत पुणे यांच्या बैलजोडीस मिळाला. आदमापूर- निढोरी दरम्यान असणाऱ्या तीन कि.मी. अंतरावर भक्तीचा जागर भक्तांना अनुभवण्यास मिळाला.
तब्बल चार तास चाललेल्या या रथोत्सवात भाविक भक्तीरसात तल्लीन झाले होते. ढोल- कैताळाच्या आवाजात धनगरी बांधव दंग झाले होते .हलगी घुमक्याच्या ठेक्यावर अश्व देखील नाचत होते.तसेच डोलणाऱ्या भक्ती वर्गासह डॉल्बीच्या ठेक्यावर तरुणाई तल्लीन होऊन नाचत होती. भंडा-याच्या मुक्त हस्ते उधळीत बाळूमामांच्या नावानं चांगभल ऽऽऽऽअशा जयघोषाने परिसर दुमदुमला होता. राजस्थान व मध्यप्रदेश मधील धनगर बांधवांनी सुमारे पन्नास लाख रुपये खर्चून दिलेल्या रथामध्ये बाळुमामांची १३८किलो चांदीची मूर्ती बसवण्यात आली होती.
रथाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. श्रींच्या रथाचे पूजन देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी केले. रथोत्सव मिरवणूक सुरक्षित व शांततेत पार पाडणेसाठी पोलीस,होमगार्ड ,सेवेकरी यांचे योगदान मोठे होते. मार्गावर बाळूमामाभक्त, सेवकांमार्फत भक्तांना मोफत खिचडी, फळे, ताक व सरबताचे वाटप करण्यात आले. रात्रभर हेडाम, वालंगासह जागर व पहाटे भाकणूक.