कोल्हापूर : 'गणपती बाप्पा मोरया…'चा जयघोष, कपाळाला भगव्या पट्या, डोक्यावर भगव्या आणि फरच्या टोप्या, हातात टाळ, घंटी, पारंपरिक वाद्यांचा दणदणाट तसेच पारंपरिक वेशभूषेत सहभागी लहान मुलांच्या आरोळ्या, ज्येष्ठांचा जल्लोष आणि महिलांच्या अभूतपूर्व उत्साहात शनिवारी लाडक्या मंगलमूर्तीचे सर्वत्र आगमन झाले. गणेश आगमनाच्या या शानदार मिरवणुकांनी अवघा जिल्हा मंगलमय झाला होता.पावसाने उसंत दिल्याने लाडक्या गणरायाचे स्वागत अपूर्व उत्साहात करण्यात आले. सकाळपासून घरगुती गणपतींचे आगमन आणि प्रतिष्ठापना झाल्यानंतर कार्यकर्ते दुपारी सार्वजनिक तालीम संस्था-तरुण मंडळांच्या मिरवणुकांसाठी बाहेर पडले. मंडळांच्या दारात ट्रॅक्टर-ट्रॉल्या, ट्रक आणि बाप्पांसाठी रथ सजविले. रोषणाईने झगमगणारे बाप्पांचे रथ त्यापुढे फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशा पथकांचा दणदणाट, त्याच्या जोडीला झांजपथक होते. दुपारपर्यंत हातातून, डोक्यावरून, हातगाड्या, दुचाकी, चारचाकी, रिक्षा, ट्रॅक्टर ट्रॉली, रथ, बग्गी, घोडागाडी, पालखीतून अनेकांनी वाजतगाजत गणपतीला घरी आणले.गणपतीलाआणण्यासाठी सहकुटूंब रस्ते फुलले होते. गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गणरायाच्या प्रतिष्ठापनेने चैतन्यदायी उत्साहपर्वाची सुरुवात झाली. यंदाच्या गणेशोत्सवाची तमाम भक्तांना उत्सुकता शिगेला पोहोचली होती, त्याची झलक गणेश आगमन मिरवणुकांतून पाहायला मिळाली.शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, रविवार पेठ, उत्तरेश्वर पेठ, सोमवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठेसह राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, सानेगुरुजी, जरगनगर, आर.के.नगर, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, कदमवाडी, जाधववाडी, भोसलेवाडी, फुलेवाडी, पाचगाव, मोरेवाडी, कळंबा, लक्षतीर्थ, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, टेंबलाईवाडी, गांधीनगर परिसरातील गणेशमूर्तींचे आगमन झाले.गंगावेस, पापाची तिकटी, शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प, मार्केट यार्डातील कुंभार व्यावसायिकांच्या गणेशशाळांसह ठिकठिकाणी उभारलेल्या गणेशमूर्ती स्टॉल्सवर लोकांची गर्दी होती. कुंभार गल्ल्यांसह प्रमुख मार्ग व चौकाचौकांत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
'बाप्पा'चा जयघोष, वाद्यांचा दणदणाट अन् मंगलमय वातावरण; कोल्हापुरात घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन
By संदीप आडनाईक | Published: September 07, 2024 3:18 PM