कोल्हापूर : कोल्हापूरकर ज्या राजाची आतुरतेने वाट बघत होते, तो बहुचर्चित रंकाळावेश गोल सर्कल मित्रमंडळाच्या ‘कोल्हापूरचा राजा’चे मोठ्या थाटामाटात रविवारी तावडे हाॅटेल चौकात ढोलताशांच्या गजरात आगमन झाले. मुंबईतील लालबागचा राजाचे प्रतिकृती असलेली ही मूर्ती मूर्तिकार रत्नाकर व संतोष कांबळी यांनी साकारली आहे.रंकाळावेश गोल सर्कल मित्रमंडळाच्या वतीने या श्रीगणेशाची ‘कोल्हापूरचा राजा’ रूपात प्रतिष्ठापना केली जाते. यंदा दहावे वर्ष आहे. गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी रंकाळा स्टॅण्ड येथील भव्य मंडपात या श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. रविवारी सायंकाळी ही गणेशमूर्ती पारंपरिक ढोल-ताशा पथक वाद्यांच्या गजरात व हजारो गणेशभक्तांच्या साक्षीने विद्युत रोषणाईत हा सोहळा जल्लोषात पार पडला. कोल्हापूरच्या राजाची प्रतिकृती १२ फूट उंचीची असून, विविध सुवर्ण आभूषणांनी सजवलेली आहे. कंटेनरमध्ये वाळू पसरून मुंबईतून ही मूर्ती कोल्हापुरात आणण्यात आली. अग्रभागी करवीर नादचे ढोलताशा पथक होते. अग्रभागी करवीर नादचे ढोलताशा पथक होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कुणाल पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
जागा मिळेल तेथे उपस्थितीकोल्हापूरच्या राजा गणेशमूर्तीचे पहिले दर्शन घ्यायचे या उद्देशाने किमान दहा हजारांहून अधिक लोकांनी हजेरी लावली. यात युवक-युवतींचा अधिक समावेश होता. अनेकांनी इमारतीसह बसस्टाॅप शेड आणि दुकानाच्या शेडवर, तर काहींनी गांधीनगर उड्डाणपुलावरील रस्त्यावर बस, ट्रक उभे केले होते. त्यावर धोकादायक उभे राहून हा सोहळा पाहिला.
वाहतुकीचा फज्जाआगमनाची मिरवणूक तावडे हाॅटेल चौकात आल्यानंतर एका बाजूने असणारी वाहतुकीची मोठी कोंडी झाली. याचा फटका तावडे हाॅटेल ते कावळा नाका येथपर्यंत, तर कावळा नाका ते शिवाजी विद्यापीठ-उड्डाणपूल रस्त्यावरील वाहतुकीला बसला. ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी तीन तासांचा कालावधी लागला.