पुराचे पाणी ओसरु लागले : एकेक मार्ग मोकळा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी भागाचा संपर्क तुटला आहे. परिणामी वाहतूक ठप्प असून भाजीपाल्याची आवक एकदम कमी झाली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पुराचे पाणी ओसरू लागले आहे. त्यामुळे एक एक मार्ग मोकळा होत असून आज सोमवारपासून कोल्हापुरात भाजीपाल्याची आवक हळूहळू पूर्वपदावर येणार आहे.
बुधवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली. शुक्रवारपर्यंत पावसाने अक्षरशः दैना उडवून दिली. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वाहतूक ठप्प झाल्याने बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक होऊ शकली नाही. परिणामी कोल्हापूर शहरात भाजीपाल्याची टंचाई भासत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांत पावसाने उसंत घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
कोल्हापूर बाजार समितीत रोज नांदणी, शिरोळ, रायबाग, घटप्रभा, बेळगाव येथून भाजीपाला मोठ्या प्रमाणात येतो. मात्र, पुराच्या पाण्याने गेले चार दिवस हा माल येऊ शकलेला नाही. रविवारी बाजार समितीत अवघ्या १७१ क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागल्याने एक एक मार्ग मोकळा होत आहे. त्यामुळे आज, सोमवारपासून भाजीपाल्याची आवक हळूहळू सुरळीत होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. शहरातील ग्राहकांना थोडा का असेना भाजीपाला उपलब्ध होईल.
बाजार समितीत रविवारी झालेली आवक
शेतीमाल आवक दर प्रतिकिलो
कोबी २१ पोती २७.५०
वांगी १६६ करंडी ३७.५०
टोमॅटो ८७ कॅरेट ३०
ओली मिरची २५ पोती ४०
ढब्बू ३१ पोती ४०
गवारी ३० पोती ४०
कारली ७३ पाटी ३०
भेंडी ५ करंडी ४०
दोडका १४ करंडी ४०
बिनीस २६ पोती ५०
प्लाॅवर २५ पोती ४२५ पाेते
कोथिंबीर २०० पेंढी ३०
कांदापात ६०० पेंढी १५
मेथी १६० पेंढी १६
पालक १२०० पेंढ्या १३
पोकळा ५०५० पेंढ्या ९
कोटः
पुराचे पाणी कमी होऊ लागल्याने आजपासून भाजीपाल्याची आवक हळूहळू वाढू लागेल. त्यामुळे शहरात भाजीपाल्याची टंचाई कमी होण्यास मदत होईल.
- जयवंत पाटील, सचिव, बाजार समिती