हातकणंगले : उपनिबंधक सहकारी संस्था, हातकणंगले यांच्या बनावट सही व शिक्क्यांचा वापर करून पेठवडगाव येथील धर्मेंद्र अश्विनकुमार शहा (वय ४०) याने शांतीकेसर शेतीमाल सहकारी संस्थेची २८ गुंठे जमीन विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हातकणंगले उपनिबंधक सुनील सिंगतकर यांनी हातकणंगले पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.पेठवडगाव येथील शांतीकेसर शेतीमाल सहकारी संस्थेने गटक्रमांक २५८ अ, ब ही जमीन शासनाकडे रीतसर संस्था नोंदणी करतेवेळी संस्था मालकीची असल्याचे स्पष्ट केले होते. संस्थेचे अध्यक्ष धर्मेंद्र शहा याने २००१ ते २०१४ या कालावधीत वरील संस्थेच्या नावे शासनाकडून ९८ लाखांचे अर्थसाहाय्य घेतले आहे; मात्र ही संस्था अवसायानात गेली आहे.तरीही धर्मेंद्र शहा याने उपनिबंधक कार्यालयाचे बनावट शिक्के तयार करून उपनिबंधकांची बोगस सही करून बनावट संमतीपत्र तयार केले आणि संस्थेच्या नावे असलेली गट क्र. २५८ अ मधील १६ गुंठे आणि ‘ब’ मधील ८ गुंठे अशी २४ गुंठे जमीन हातकणंगले दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये खरेदीदस्त क्र. ३६४ व ४१६१-२०१४ ने पेठवडगाव येथील संतोष गाताडे यांना परस्पर विक्री केली.शासनाची फसवणूक केल्याचा उलगडा होताच उपनिबंधक सुनील सिंगतकर यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. धर्मेंद्र शहा यास हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी करीत आहेत.
शेतीमाल संस्थेच्या अध्यक्षाला अटक
By admin | Published: November 19, 2014 10:53 PM