(लोकमत न्यूज नेटवर्क)
भोगावती : खरीप हंगामातील ऊस पिकाची मशागत आणि भरणीची धांदल मोठ्या प्रमाणात सुरू असताना युरियासह इतर रासायनिक खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. ३१ मार्चच्या नावाखाली होलसेल व्यापाऱ्यांसह किरकोळ विक्रेत्यांनीही वाढीव दराने खत विकण्याचे उद्योग सुरू केले आहेत. प्रशासनाकडून खतांच्या किमती जैसे थे असल्याच्या स्पष्टपणे सूचना मिळूनही नवीन दराने विक्री करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
खरीप हंगामातील ऊस पिकासाठी खतांची सध्या कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. ऊस भरणीसाठी शेतकऱ्यांची धांदल सुरू आहे. अशा परिस्थितीत युरिया, डीएपी यांची विक्री मात्र चढ्या दराने केली जात आहे. इफको, डीएपी यांचे गेल्या महिन्यातील दर बाराशे रुपयांच्या आसपास असताना आता मात्र या खतांच्या किमती १,७०० ते दाेन हजारपर्यंत लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
नुकत्याच झालेल्या गळीत हंगामातील अनेक कारखान्यांची ऊसबिले अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे सध्या पैशाची आर्थिक टंचाई खूप मोठ्या प्रमाणात आहे. खत विक्री करणारे घाऊक व्यापारी, किरकोळ विक्रेते मनमानी करून खताची विक्री वाढीव दराने करत आहेत. यावर मात्र जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्वतः जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आता यात लक्ष घालावे, अशी मागणी शेतकर्यांमधून जोर धरू लागली आहे.
सध्या ऊस भरणीसाठी खतांची तत्काळ उपलब्धता करणे गरजेचे असताना, खत विक्रेते मात्र वाढीव दराने खते विकण्यासाठी विविध मार्ग शोधत आहेत. यावर तत्काळ जिल्हा प्रशासनाने कारवाई करून खते उपलब्ध करून द्यावीत आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही जिल्हा प्रशासनाला जाब विचारावा, अशी मागणी होऊ लागली आहे.