कोल्हापूर : प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. मी मराठी चित्रपटसृष्टीत काम करत असले व अभिनेत्री म्हणून माझे नाव असले तरी माझ्याकडे काम नव्हतं, त्यावेळी मी आॅर्केस्ट्रात काम करायचे. प्रकाश हिलगेंमुळे कलापथकांशी जोडले गेले आणि माझं कुटुंब या कलापथकांनी सावरले. येथील या कलापथकातील एक कलावंत म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहे, असे मनोगत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांनी व्यक्त केले. गायन समाज देवल क्लबमध्ये आयोजित कलापथक कलाकार संघटनेच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे कार्यवाह सुभाष भुरके होते. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर, प्रफुल्ल महाजन, शिवकुमार हिरेमठ, शोभा पाटील, रजनी बोरड, संघटनेचे अध्यक्ष धनंजय पंडित उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक मास्टर रमजान फकिर यांना ‘निर्मलाताई कोराणे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यशवंत भालकर म्हणाले, कलावंताला कष्ट सोसावेच लागतात. ते सोसताना कुणावरही टीका न करता आपले काम करत राहावे, यापूर्वीच्या कलावंतांनी खूप हालअपेष्टा सोसून ही कला जिवंत ठेवली आहे. सुभाष भुरके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भीमराव पोवार, आकाश कांबळे, अमोल कुलकर्णी, लता गुरव, साधना परब, मंजुश्री वालावलकर, वासंती देसाई यांना ‘कलापथक रत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रल्हाद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय पंडित यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश पाटोळे यांनी आभार मानले. सोहळ््यानंतर कलावंतांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. (प्रतिनिधी)
कलापथकांनी माझे कुटुंब सावरले
By admin | Published: January 03, 2015 12:41 AM