लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : देवीचा जागर (आराधी) करण्यासाठी कोल्हापुरात बोलावलेल्या लातूर जिल्ह्यातील राचन्नावाडी (ता. चाकूर) येथील कलाकारांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन लुटण्याचा प्रकार घडला. बेशुद्ध होऊन निपचीत पडलेल्या महिला व पुरुषांच्या अंगावरील लाखो रुपयांचे दागिने व रोकड घेऊन लुटारूने पोबारा केला. बिंदू चौकानजीक गंजी गल्लीतील एका यात्री निवासमध्ये हा प्रकार बुधवारी दुपारी बारा वाजता उघडकीस आला. बेशुद्धावस्थेतील व गुंगीतील नऊजणांना पोलिसांनी उपचारासाठी सीपीआर रुग़्णालयात दाखल केले.
याठिकाणी उपचार घेणाऱ्यांमध्ये सखुबाई पिराजी सूर्यवंशी (वय ४०), द्रुपदा मल्हारी सूर्यवंशी (५०), कमलाबाई महादेव कांबळे (५५), कुमाबाई रामकिशन कौर (४०), ताईबाई मल्हारी सूर्यवंशी (४५), मसनाजी पांडुरंग चिंचोळे (२४), रामकिशन सीताराम कौर (४८), अशोक अंकुश भरळे (५५), मल्हारी गणपती सूर्यवंशी (४२, सर्व रा. राचन्नावाडी, ता. चाकूर, जि. लातूर) यांचा समावेश आहे.
राचन्नावाडी येथील देवीचा जागर (आराधी) करणाऱ्या ग्रामीण कलाकारांच्या नऊजणांच्या ग्रुपला कोल्हापुरात अंबाबाई देवीची गाणी म्हणण्याच्या कार्यक्रमासाठी एका व्यक्तीने फोनवरच नियोजन करून पाचारण केले. त्यांना १४ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार पाच महिला व चार पुरुष असे झांज, ढोलकी साहित्य घेऊन एस. टी. बसने मंगळवारी मध्यरात्री कोल्हापुरात आले. त्यांना मध्यवर्ती बसस्थानक परिसरात संबंधित व्यक्तीने गाठले. तेथून सर्वांना रिक्षाने गंजी गल्लीतील यात्री निवासातील रूममध्ये ठेवले. लुटारूने येतानाच त्यांच्यासाठी जेवण आणले होते. रात्रीच्यावेळी सर्व जेवले, त्यानंतर काही वेळातच सर्वांना चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. त्यानंतर लुटारूने महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व बॅगमधील रोकड घेऊन पहाटे पलायन केले.
सकाळी नऊ वाजता यात्री निवासचा कामगार चेकआऊटसाठी आला; परंतु दरवाजाला कुलूप दिसले. भाविक अंबाबाई दर्शनासाठी गेले असावेत, असे त्याला वाटले. दुपारी बाराच्या सुमारास सखुबाई सूर्यवंशी या महिलेने आतून दरवाजा ठोठावल्याने व्यवस्थापक अमर पाटील याने दुसऱ्या चावीने कुलूप काढून दरवाजा उघडला.
यावेळी रूममधील दृश्य भयानकच होते. दोन महिला व एक पुरुष गुंगीत होते, तर इतर बेशुद्धावस्थेत निपचीत पडले होते. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर लुटीचा प्रकार उघड झाला.
मोबाईल फोडला, इतर पाण्यात बुडवले
कार्यक्रमासाठी लुटारूने संबंधित कलाकारांना ज्या फोनवर फोन केले, तो मोबाईल फोडला, तर इतर मोबाईल हे पाण्याच्या बादलीत बुडवून ठेवले. ही बादली बाथरूममध्ये पोलिसांना मिळाली.
सीसी फुटेजमध्ये लुटारू कैद
संबंधित लुटारू हा ४० वर्ष वयोगटातील असून, त्याने मंगळवारी सायंकाळीच यात्री निवासमध्ये रूम बुक करण्याबाबत चौकशी केली होती. त्यानंतर रात्री १२ वाजता तो सर्वांना घेऊन आला. त्याने सखुबाई सूर्यवंशी नावाने रूम ताब्यात घेतली, त्यांचे आधारकार्डही ठेवून घेतले. लुटारूने आपला डाव आटोपता घेऊन पहाटे दाराला बाहेरून कुलूप लावून पोबारा केला. लुटारूची हालचाल यात्री निवासमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.