आमजाई व्हरवडे : ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील असा विश्वास दुर्गमानवाडचे प्रसिद्ध ग्रामदैवत विठ्ठलाई मंदिरात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्याने आगामी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत अरुण डोंगळे हे हसन मुश्रीफ यांच्याबरोबर राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अभिषेक डोंगळे युवा ट्रस्टच्यावतीने रक्तदान शिबिर व स्नेहभोजन अशा संयुक्त कार्यक्रमात मुश्रीफ बोलत होते.
‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भरवलेले रक्तदान शिबिर आणि देवीच्या जत्रेचा कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी डोंगळे यांनी ज्या उद्देशाने हा कार्यक्रम घेतला तो उद्देश सफल व्हावा असे सांगत, भविष्यातील ‘गोकुळ’च्या राजकारणात अरुण डोंगळे हे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबत असतील याचे संकेत दिलेत. याचे समर्थन खुद्द अरुण डोंगळे यांनी केले.
राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक डोंगळे युवा शक्तीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भैया माने, युवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक किसन चौगले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाविषयी आणि डोंगळे यांच्या भूमिकेविषयी राधानगरी तालुक्यात उलटसुलट चर्चा होती. आमदार पी. एन. पाटील समर्थक अनेक कार्यकर्त्यांनी डोंगळे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने त्यांनी कार्यक्रमालाच गैरहजेरी लावली. कार्यक्रम स्थळी पत्रकारांनी हसन मुश्रीफ यांना याविषयी छेडले असता, अरुण डोंगळे हे माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्या घरगुती कार्यक्रमाला मी आलो आहे, डोंगळे यांनी ज्या उद्देशाने हा कार्यक्रम घेतला तो उद्देश सफल होवो अशी गुगली टाकत, अरुण डोंगळे हे ‘गोकुळ’च्या निवडणुकीत आपल्या सोबत असल्याचे संकेत दिले.
...........................
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे स्वागत करताना अरुण डोंगळे, अभिजित डोंगळे. सोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष ए. वाय. पाटील, किसन चौगले, फिरोजखान पाटील, बी. के. डोंगळे उपस्थित होते.