लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीच्या रिंगणातून ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी माघार घेतली. त्यांचे सुपुत्र चेतन नरके हे सत्तारुढ गटातून राहणार असल्याने नरके यांनी त्यांच्यासह स्निग्धा नरके यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला.
‘गोकुळ’ च्या २१ जागांसाठी ४८२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर २४१ जणांचे ३९० अर्ज वैध ठरले असून ७५ जणांचे ९२ अर्ज अवैध ठरले. मंगळवारपासून माघारीस सुरुवात झाली आहे. बुधवारी माघारीच्या दुसऱ्या दिवशी दोघांनीच अर्ज मागे घेतले. ज्येष्ठ संचालक अरुण नरके व त्यांच्या स्नुषा स्निग्धा नरके यांनी अर्ज मागे घेतला.
‘गोकुळ’मध्ये अरुण नरके ४३ वर्षे कार्यरत आहेत. यावेळेला ४३ वर्षांत पहिल्यांदाच ते रिंगणाबाहेर राहिले आहेत. त्यांच्या ऐवजी चेतन नरके हे रिंगणात राहणार आहेत. सत्तारुढ आघाडीमध्ये अरुण नरके, रवींद्र आपटे यांच्यासारखे चेहरे पाहिजेत, यासाठी नेते आग्रही होते. मात्र अरुण नरके यांनी दोन वर्षांपूर्वीच आपण ‘गोकुळ’च्या रिंगणातून माघार घेत असल्याची घोेषणा केली होती.
शासकीय सुट्ट्या वगळता २० एप्रिलपर्यंत माघार घेता येणार आहे. २२ एप्रिल रोजी चिन्हे वाटप तर २ मे रोजी मतदान होणार आहे.