कोल्हापूर : शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत अरुण पांडव याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक सुभाष गंगाधर पन्हाळे (रा. बिबवेवाडी, पुणे) याला उच्च न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. ही शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम केली असून, तेव्हापासून आरोपी पन्हाळे हा फरार आहे.
अरुण पांडव (रा. शनिवार पेठ) याचा १९८५ मध्ये शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत पोलिसांनी केलेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यानुसार तत्कालीन पोलीस निरीक्षक पन्हाळे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. २००७ मध्ये उच्च न्यायालयाने या गुन्ह्याच्या खटल्यामध्ये पन्हाळे याला सात वर्षांची शिक्षा सुनावली. त्यावर त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या अपिलाचा निकाल २०१३ मध्ये लागला. त्यामध्ये न्यायालयाने त्याची ही शिक्षा कायम केली.
आरोपी पन्हाळे फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याचा ठावठिकाणा माहीत नसल्याने पोलिसांना शोध घेण्यास अडचणी येत आहेत. त्याच्या वास्तव्याची माहिती कोणाला असल्यास त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, कोल्हापूर फोन (०२३१) २६६५६१७, तपास अधिकारी, राजेंद्र सानप ८६८९८८१००० यावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी केले आहे.