कोल्हापूर : येथील ‘निर्माण’ कस्न्ट्रक्शन्सचे अरुण भैरू पाटील यांना इन्फ्रास्ट्रक्चर व बांधकाम क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल बेळगाव येथील नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटीचा पुरस्कार जाहीर झाला. हा आंतरराज्य पुरस्कार रविवारी बेळगाव येथे होणाऱ्या समारंभामध्ये वितरित करण्यात येणार आहे.
करवीर तालुक्यातील वडणगे येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अरुण पाटील यांनी बांधकाम क्षेत्रात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९९४ साली त्यांनी खाजगी कामे घेण्यास सुरुवात केली. कामाचा दर्जा गुणवत्ता व कमी वेळेत कामाची पूर्तता यामुळे टप्प्याटप्प्याने त्यांच्या निर्माण कंपनीला जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर महापालिका, नॅशनल हायवे अशी राज्य व केंद्र स्तरावर रस्ते विकासाची कामे मिळत गेली. महाराष्ट्रात ‘स्काडा’ टेक्नॉलॉजी सर्वप्रथम त्यांनी विकसित केली आहे. अरुण पाटील यांनी २०११ मध्ये ‘रोड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची’ स्थापना केली असून, अध्यक्ष या नात्याने त्यांनी सरकार दरबारी कॉन्ट्रॅक्टर यांचे प्रलंबित प्रश्न, समस्या याबाबत आवाज उठविला आहे. सध्या त्यांच्या कंपनीचे २३ प्रकल्प सुरू आहेत. त्याचबरोबर त्यांनी मोक्याच्या पाच ठिकाणी गृहनिर्माण उभारले असून, डिसेंबरपर्यंत आणखी दोन मोठे प्रकल्प सुरू होणार आहेत.
पाटील यांनी वेगवेगळ्या सामाजिक, धर्मादाय संघटना, तसेच गोर-गरिबांना सढळ हाताने मदत केली आहे. सद्य:स्थिती कोरोना काळात त्यांनी सॅनिटायझर, मास्क, स्टीम मशीन, तसेच अन्नधान्याची पाकिटे महानगरपालिका, गाव, तसेच सामाजिक संस्था व गोरगरिबांना दिली आहेत. त्यांच्या या चौफेर कामगिरीची दखल घेऊनच त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
०४०९२०२१ कोल अरुण पाटील न्यूज फोटो