कोल्हापूर : अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा ‘साहित्य जीवनगौरव’ पुरस्कार साहित्यिक अरुण साधू यांना जाहीर झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते हमीद दलवाई यांना मरणोत्तर ‘सामाजिक कार्य जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. प्रत्येकी दोन लाख रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय विविध क्षेत्रांतील अन्य सात मान्यवरांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत. साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. फाउंडेशनतर्फे गेल्या २२ वर्षांपासून हे पुरस्कार दिले जातात. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा एक लाख रुपयांचा पुरस्कार नाट्यकर्मी अतुल पेठे यांना जाहीर झाला आहे. याचबरोबर मुंबईच्या अंजली जोशी यांना ‘विरंगी मी, विमुक्त मी’ या कादंबरीसाठी ललितग्रंथ पुरस्कार, पुण्याचे अरुण जाखडे यांच्या ‘इर्जिक’ या पुस्तकाला विशेषग्रंथ पुरस्कार; तर औरंगाबादचे अनिलकुमार साळवे यांना रा. शं. दातार नाट्यपुरस्कार दिला जाणार आहे. २५ हजार रोख व स्मृतिचिन्ह असे या तीन पुरस्कारांचे स्वरूप आहे. सामाजिक कार्यासाठी गडचिरोली येथील देवाजी ताफा यांना प्रबोधन या विभागातील, निपाणीच्या सुशीला नाईक यांना असंघटित कष्टकरी या विभागातील, तर गागोदेमधील विजय दिवाण यांना सामाजिक प्रश्न या विभागातील कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रातील या पुरस्कारासाठी प्रत्येकी ५० हजार व स्मृतिचिन्ह असे याचे स्वरूप आहे. दलवाई यांच्यासाठी देण्यात येणारी रक्कम इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट व मुस्लिम सत्यशोधक मंडळ या दोन संस्थांना विभागून देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)पुरस्कार वितरण ७ जानेवारीला, पुणे येथील बालगंधर्व रंग मंदिरात प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईतील केशव गोरे स्मारक ट्रस्ट व पुण्यातील साधना ट्रस्टतर्फे या कार्यक्रमाचे संयोजन केले जाते.
अरुण साधू यांना साहित्य जीवनगौरव
By admin | Published: December 21, 2016 11:25 PM