तर, आम्ही युद्ध सुरू होण्यापूर्वीच घरी पोहोचलो असतो, कोल्हापूरच्या आर्याने व्यक्त केलं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 12:01 PM2022-03-01T12:01:46+5:302022-03-01T12:02:24+5:30
युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या कोल्हापूरच्या आर्या नितीन चव्हाण आणि ऋतुजा जलित कांबळे या दोन लेकी रविवारी रात्री उशिरा सुखरूप घरी परतल्या.
कोल्हापूर : युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या कोल्हापूरच्या आर्या नितीन चव्हाण आणि ऋतुजा जलित कांबळे या दोन लेकी रविवारी रात्री उशिरा सुखरूप त्यांच्या घरी परतल्या. त्यांच्या पालकांच्या जीवाला लागलेला घोर संपला. आर्या आणि ऋतुजा यांना भेटून त्यांची विचारपूस करण्यासाठी सोमवारी दिवसभर त्यांच्या घरी नातेवाईक, मित्रमंडळींची गर्दी झाली.
शुक्रवारपेठ धनवडे गल्लीमधील आर्या आणि फुलेवाडीमधील ऋतुजा ही एमबीबीएसच्या शिक्षणासाठी तीन महिन्यांपूर्वी युक्रेनला गेल्या होत्या. गेल्या आठवड्यात गुरुवारपासून युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध सुरू झाले. त्यामुळे आर्या, ऋतुजा यांच्या पालकांना त्या घरी कशा सुखरूप पोहोचणार याचा घोर लागला होता.
भारतीय दूतावासाच्या माध्यमातून युक्रेनमधून रुमानिया आणि तेथून मुंबईमध्ये शनिवारी त्या पोहोचल्या. मुंबईतून रविवारी रात्री उशिरा त्या कोल्हापूरमधील आपल्या घरी सुखरूप पोहोचल्या. कुटुंबातील इतर सदस्यांना पाहून त्यांना अश्रू अनावर झाले.
तर, आम्ही युद्ध सुरू होण्यापूर्वीच घरी पोहोचलो असतो
रशियाने १४ फेब्रुवारीपासून युद्ध करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी आमच्या बुकोविनीयन विद्यापीठाने तुम्हाला हवे असेल, तर तुम्ही आपल्या देशात जाऊ शकता असे सांगितले होते. भारतात येण्यासाठीच्या विमानाचे तिकीट दुप्पट झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला. हे दर कमी असते, तर आम्ही युद्ध सुरू होण्यापूर्वीच घरी पोहोचलो असतो. - आर्या चव्हाण
- आम्ही युक्रेनमध्ये ज्या ठिकाणी राहत होतो. त्या ठिकाणी सुरक्षित होतो. बुकोविनीयन विद्यापीठातील शिक्षक, वरिष्ठ विद्यार्थ्यांनी आम्हा भारतीय विद्यार्थ्यांना मोठी मदत केली. रुमानियाची बॉर्डर सोडण्यासाठी अधिष्ठाता आले होते.
- युक्रेन, रुमानियातील लोकांनी खूप काळजी घेतली. केंद्र सरकारने पाठविलेल्या विमानातून आम्ही देशात आलो. रशियाने युद्धाचा इशारा दिल्यानंतर लगेचच अमेरिकेने त्यांचे विद्यार्थी नेले. त्याप्रमाणे आपल्या देशाने कार्यवाही केली असती, युद्ध सुरू होण्यापूर्वीच आम्ही सर्व विद्यार्थी तेथून बाहेर पडलो असतो. सुखरूप घरी पोहोचल्याचा आनंद वाटत असल्याचे आर्याने सांगितले