इचलकरंजी : घरची परिस्थिती हलाखीची, त्यात वडिलांचा वैद्यकीय खर्च आणि दहावीच्या सुरूवातीलाच वडिलांचे निधन अशा संकटांनी घेरलेल्या परिस्थितीत समारंभामध्ये वाढपीचे काम करून येथील आर्यन दीपक चावरे या विद्यार्थ्याने इयत्ता दहावीत यशाला गवसणी घातली.आर्यनचे वडील आजारी असल्याने त्यांच्या उपचारासाठी खर्चाची तरतूद करत चावरे कुटुंबीय जेमतेम संसार चालवत होते. त्यामुळे आर्यनने कुटुंबाला हातभार लावण्यासाठी समारंभांमध्ये वाढपीचे काम धरले. काम करत शिक्षणही सुरू ठेवले. त्यात इयत्ता दहावीच्या सुरूवातीला आर्यनच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर खचून न जाता जिद्दीने गोविंदराव हायस्कूलमध्ये त्याने दहावीचे शिक्षण घेतले आणि ६९ टक्के गुण मिळवले.आई संध्याराणी आणि आजी यंत्रमाग कारखान्यात कांड्या भरण्याचे काम करतात. सर्व सुविधा उपलब्ध असतानाही अनेकांना शिकवणी लावून यशापर्यंत पोहोचताना नाकीनऊ येतात. त्यात आर्यनने कष्टाने शिक्षण घेतले असून, पुढील शिक्षणही तो उत्तमपणे करेल, असे आईने सांगितले. आर्यन हा खो-खो खेळाडू असून त्याचे हस्ताक्षरही उत्तम आहे. शांत व शिस्तबद्ध विद्यार्थी असल्याचे वर्गशिक्षक यु. बी. खैरमोडे यांनी सांगितले.
Kolhapur: वाढपीचे काम करत दहावी परीक्षेत आर्यनची यशाला गवसणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 12:52 PM