संदीप आडनाईककोल्हापूर : मुलावर संकट आलं की, आईच आपला जीव धोक्यात घालून पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढू शकते, याचा प्रत्यय कोल्हापुरात येतो आहे. दोन्ही किडन्या निकामी असलेल्या ३६ वर्षीय मुलासाठी ही ५८ वर्षांची माउली आपली एक किडनी देण्यासाठी सरसावली आहे.चांदोली धरणाशेजारील शाहूवाडी तालुक्यातील मालेवाडी गावच्या या माउलीने मुलाला वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला आहे. सुशीला जगन्नाथ माळी, असे तिचे नाव आहे. पती शेतकरी आहेत. त्यांना विनायक, विजय आणि छाया, अशी तीन मुले आहेत. अतिशय कष्ट करून त्यांनी त्यांना शिकविले, सर्वांचा विवाहही पार पाडला. मोठा मुलगा विनायक मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून गुजरात राज्यातील वापीजवळ प्लॅन्टहेडची नोकरी करत होता, तर धाकटा मुलगा विजय कुडाळ येथे सिव्हिल इंजिनिअर आहे. मुलीलाही नागाव येथील चांगले स्थळ मिळाले.सर्व चांगले चालले असतानाच दिवाळीदरम्यान विनायकच्या दोन्ही किडन्या निकामी असल्याचे समजले. त्याच्यावर डायलिसिसवर जगण्याची वेळ आली. येथून पुढे जिवंत राहण्यासाठी किडनीचं प्रत्यारोपण करणं गरजेचं बनलं होतं; पण किडनी कोण देणार, हा प्रश्न त्याच्यासमोर होता. त्याच्या आईसाठी तर हा मोठाच धक्का होता.
डॉक्टरांनी नातेवाइकांमधील एखाद्याची एक किडनी मिळाल्यास मुलाचा जीव वाचू शकतो, असं सांगताच त्या माउलीनं किडनीच काय लेकासाठी काळीज मागितलं असतं तरी दिलं असतं, असं सांगून आपल्या जिवाची पर्वा न करता किडनी दान करायला तयार झाल्या आणि या कुटुंबासमोरील पेच सुटला. डॉक्टरांनी सर्व चाचण्या आणि तपासण्या केल्यानंतर त्यांची किडनी मुलाला योग्य ठरेल, असा अहवाल दिल्यामुळे आता या मुलाचा जीव वाचणार आहे. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उद्या, शनिवारी पहाटे ही शस्त्रक्रिया होणार आहे.