भारत चव्हाणकोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेत पूर्वीच्या मंजूर आस्थापनांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४६६१ पदांपैकी तब्बल १७८२ पदे रिक्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून एवढी पदे रिक्त असल्याने प्रशासनाला महापालिकेचा गाडा चालविणे एक आव्हान झाले असून असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवरच जादा कार्यभार सोपवून कामकाज करण्याचा कसाबसा प्रयत्न सुरू आहे. राज्य सरकारकडे महापालिकेने नवीन आकृतीबंध मंजुरीकरिता पाठविला असून, तो प्रलंबित आहे. त्याला मंजुरी मिळल्यानंतर सरळसेवा भरतीचा मार्ग मोकळा होईल.महानगरपालिका प्रशासनाचा आकृतीबंध गेल्या पंचवीस वर्षांपासून एकच आहे. गेल्या वर्षी त्यातील काही पदे कालबाह्य झाल्याने तसेच काही नवीन पदे निर्माण करण्याची गरज निर्माण झाल्याने नवीन आकृतीबंध मंजुरीला पाठविला आहे. त्यालाही आता एक वर्ष झाले. राज्यातील अन्य महापालिकांचे आकृतीबंध मंजूर झाले; पण कोल्हापूरवर अजून निर्णय झालेला नाही. त्यामुळे सरळ सेवा भरतीत अडचणी आल्या आहेत.महापालिकेत दोन अतिरिक्त आयुक्तपदे असून, त्यातील एक पदोन्नतीने तर एक शासन नियुक्तीने भरायचे आहे. पदोन्नतीचे एक पद सध्या रिक्त असल्याने ते शासनानेच भरून टाकले आहे. अति. आयुक्त, आरोग्याधिकारी, उपशहर अभियंता, उपशहर रचनाकार ही वर्ग ‘अ’मधील चार पदे रिक्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही पदे भरलेली नाहीत. आरोग्याधिकारी तर गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहे. संपूर्ण कोरोना काळात प्रभारीवर कार्यभार सोपविला होता.वर्ग ‘ब’मधील ४१ वैद्यकीय अधिकारी, १० कनिष्ठ अभियंता, १६ सिस्टर, चार अधीक्षक, तीन विभागीय आरोग्य निरीक्षक यांच्यासह सहायक विद्युत अभियंता, सहायक अभियंता स्थापत्य, महिला व बाल विकास अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, उपमुख्य लेखापाल, मुख्य अग्निशमन अधिकारी ही पदेही रिक्त आहेत. वर्ग ‘क’मधील ३५ वरिष्ठ लिपिक, १२० कनिष्ठ लिपिक, ५४ नर्स, १४ सहायक आरोग्य निरीक्षक, १५ पंप ऑपरेटर व १२८ वाहनचालकांची पदे भरावी लागणार आहेत.
वर्ग/सरळ सेवा/पदोन्नती/एकूणवर्ग अ/ १ / ३ / ४वर्ग ब / ६७ / २५ / ९२वर्ग क / ३४४ / १७१ / ५१५वर्ग ड / ९३७ / २३४ / ११७१एकूण / १३४९ / ४३३ / १७८२
मुख्य पदं असूनही नियुक्ती प्रभारी
- आरोग्याधिकारी - डॉ. प्रकाश पावरा
- उपशहर अभियंता - रमेश कांबळे
- उपशहर अभियंता - सतीश फप्पे
- मुख्य अग्निशमन अधिकारी - मनीष रणभिसे
यांच्याकडे आहेत डबल चार्ज
- संजय सरनाईक - सहायक आयुक्त, लेखापाल
- डॉ. विजय पाटील - सहायक आयुक, पशुवैद्यकीय अधिकारी
- नारायण भोसले - उपशहर अभियंता, प्रधानमंत्री आवास योजना
- सुधाकर चल्लावाड - करनिर्धारक, मुख्य आरोग्य निरीक्षक
- प्रीती घाटोळे - महिला बाल कल्याण, भांडार
‘आकृतीबंध’कडे शासनाचे दुर्लक्षराज्यातील सर्वच महानगरपालिकांना त्यांचे कर्मचारी आकृतीबंध निश्चित करून त्यासंबंधीचा आराखडा नगरविकास विभागाकडे पाठवावा, अशा सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने काही पदे कालबाह्य ठरल्याने ती रद्द केली तर काही पदांची नव्याने निर्मिती केली. तसा आकृतीबंध शासनाकडे पाठवून दिला. त्याला आता दीड वर्ष होत आहे. राज्यातील अन्य महापालिकांचे आकृतीबंध मंजूर झाले, परंतु कोल्हापूर महापालिकेचा मात्र मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. याबाबतचा फॉलोअप कोणी घ्यायचा, असा प्रश्न तयार झाला आहे.