कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी दोन दिवसांत तब्बल १ लाख ५८ हजार ३१४ भाविक नतमस्तक झाले. सलग सुट्यांमुळे गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरात भाविक आणि पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली आहे. रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत ८४ हजार २०७ भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले, तर शनिवारी ७४ हजार १०७ भाविकांनी देवीचे दर्शन घेतले होते.
शुक्रवारी प्रजासत्ताक दिनाची सुटी, नंतर शनिवार आणि रविवार अशा सलग तीन सुट्यांची पर्वणी मिळाल्यामुळे अनेकजण दोन, तीन दिवसांच्या सहलीसाठी बाहेर पडले आहेत. रविवारी पहाटेपासून सायंकाळपर्यंत बिंदू चौक, दसरा चौक, भाऊसिंगजी रोड, मिरजकर तिकटी, आईसाहेब महाराज पुतळा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक आदी रस्ते वाहनांनी भरुन गेले होते. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत होती. सलग सुटी मिळाल्याने कोल्हापुरातील यात्री निवास, हॉटेल्स, महालक्ष्मी धर्मशाळा फुल्ल आहेत.