कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे आज, बुधवारी सकाळी उघडल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी ५ फुटांनी वाढून ४५ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राधानगरीसह कोल्हापूर शहर, ग्रामीण भाग, करवीर या भागांना अलर्ट करण्यात आले आहे. ४५ फुटांपर्यंत पाणी आल्यानंतर ज्या ठिकाणी पुराचे पाणी येते येथील सर्व नागरिकांचे दुपारपर्यंत स्थलांतर करण्यात येत आहे. घरापर्यत पाणी येण्याची वाट ब बघता तातडीने लोकांनी सामान बांधून तयार रहावे, प्रशासनाकडून सूचना मिळताच जवळील निवारागृहात जावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, राधानगरी धरणातील पाणी भोगावती नदीत जाऊन, पंचगंगेत यायला व पुढे शहरापर्यंत पोहोचायला १५ तास, कोल्हापुरातून इचलकरंजी पोहोचायला ६ ते ८ तास व तेथून शिरोळमध्ये पोहोचायला ५ ते ६ तास लागतात. त्यामुळे राधानगरी काठची गावे, कोल्हापूर शहर, हातकणंगले व शिरोळ या भागांना अलर्ट देण्यात आला आहे. राधानगरी धरणातून सध्या ५७०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कुंभी, कासारीतुन देखील काही प्रमाणात पाणी सोडल्याने पूर नियंत्रणासाठी मदत झाली आहे. तुळशी धरणातून अजून पाणी सोडलेले नाही. दुसरीकडे अजून काेयनेतून विसर्ग सुरू न झाल्याने पंचगंगा नदीचे पाणी कृष्णा नदीत मिसळून पुढे प्रवाह योग्य रितीने सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर पूरजन्य स्थितीच्या उंबरठ्यावर असले तरी परिस्थिती अजून नियंत्रणात आहे.अलमट्टी ५१७ मीटरवर स्थिर..अलमट्टी धरणातील विसर्गाबाबत महाराष्ट्र व कर्नाटक मधील सिंचन विभागामध्ये योग्य समन्वय आहे. या धरणातील पाणी १५ ऑगस्टपर्यंत ५१७.५ मीटरवर ठेवण्याचा निर्णय झाला असून बुधवारी सकाळीदेखील धरणातील पाण्याची पातळी स्थिर आहे.