कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ३६ फुटांवर जाताच शहरातील पूर क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतर होण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. स्थलांतरित कालावधीत संबंधित नागरिकांना जेवण पुरविण्यासाठी एजन्सी निश्चित केली असून यासाठी स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्याच्या सूचना बुधवारी अतिरिक्त अधिकारी रविकांत आडसूळ यांनी मुख्य अग्निशमन अधिकारी यांना दिल्या.जिल्ह्यात सर्वत्र गेले दोन दिवस पडत असलेल्या संततधार पावसाच्या पाश्वभूमीवर कुठल्याही प्रकारची अनुचित दुर्घटना होऊ नये म्हणून अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांनी बुधवारी महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतती.मुसळधार पावसाच्या पाश्वभूमीवर महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून या कालावधीत सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना आडसूळ यांनी दिल्या.सर्व विभागाने समन्वयाने काम करून रस्त्यावरील कचरा, खड्डे व झाडे कटिंग करा. पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी सर्व निवारा केंद्रे सुस्थितीत ठेवून त्या ठिकाणी लाइट, पाणी व इतर व्यवस्था उपशहर अभियंता यांनी करावी. या ठिकाणी स्थलांतरित नागरिकांची दैनंदिन सर्व माहिती उपशहर अभियंता यांनी नियंत्रण कक्षाकडे देण्याच्या सूचना दिल्या.यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, शहर अभियंता हर्षजित घाटगे, सहायक आयुक्त संजय सरनाईक, डॉ. विजय पाटील, उपशहर अभियंता नारायण भोसले, एन. एस. पाटील, सतीश फप्पे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, सहायक अभियंता व्ही. एन. सुरवर्से, यांत्रिकी सहायक अभियंता चेतन शिंदे, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, विद्युत अभियंता चेतन लायकर, उप-जल अभियंता रावसाहेब चव्हाण, महाराष्ट्र सोल्जर फोर्सचे सुरेश पाटील सर्व कनिष्ठ अभियंता, सर्व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.अशी असेल यंत्रणा
- प्रत्येक विभागीय कार्यालयात एक जे.सी.बी., एक डंपर व एक ट्रॅक्टर
- महापालिकेच्या मुख्य इमारतीही सर्व यंत्रणा सज्ज असेल.
- पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी ५६ खासगी टँकर, महापालिकेचे ६ टँकर
- कनिष्ठ अभियंता भागात फिरती करून खड्डे बुजविणार
- संभाजीनगर कामगार चाळीतील कर्मचाऱ्यांना स्थलांतर करणार
- पाणी येते त्या भागात आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रात्यक्षिके घेणार
- महापालिकेच्या आठ व खाजगी सहा बोटी सज्ज