समीर देशपांडेकोल्हापूर : कुणीही उठावं आणि कोणतंही अभियान, उत्सव सुरू करावा आणि त्यासाठी शाळा, शिक्षकांना वेठीस धरावं, अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे. सध्या राज्यातील शाळांमध्ये दोन अभियाने आणि एक उत्सव सुरू आहे. त्यामुळे ऑगस्ट अखेरीपर्यंत शिकवण्यापेक्षा यातील उपक्रम आणि कार्यक्रम राबवण्यातच शिक्षकांची ताकद खर्ची पडणार आहे. विधानसभा आचारसंहितेनंतरच हे सर्व काही थंड होण्याची शक्यता आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा दुसरा टप्पा २९ जुलैपासून सुरू होऊन तो ४ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. ५ सप्टेंबरपासून या स्पर्धेसाठीचे मूल्यांकन होणार असून यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर मोठी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना सहभागी करून घेण्यासाठी प्रशासन धावपळीत आहे. अशातच नेहमीच्या उपक्रमांपेक्षा वेगळे उपक्रम राबवयाचे असल्याने शिक्षक आता याच कामात गुंतले आहेत.याच पद्धतीने २२ जुलैपासून सर्व शाळांमध्ये ‘महावाचन उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव ३० ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या काळात वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी, विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी, दर्जेदार साहित्यिक आणि लेखक यांची भेट होऊन त्यांचा परिचय करून देण्यासाठीचे उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे सध्या शिक्षकवर्ग साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार यांना साहित्यविषयक उपक्रमांसाठीच्या निमंत्रणाच्या आणि नियोजनाच्या गडबडीत आहेत.
याचवेळी १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या २० दिवसांत अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी द्यायच्या आहेत. त्यानंतर सहा दिवसांत या शाळेतील त्रुटी दूर करून, सुधारणा करून घ्यावयाच्या आहेत. त्यानंतरच्या चार दिवसांत या सुधारणा झाल्याची, त्रुटी दूर झाल्याची खात्री करून घ्यायची आहे. आठवड्यातील सोमवार आणि शुक्रवारी दोनच दिवस कार्यालयात थांबून उर्वरित तीन-चार दिवस शाळांना भेटी देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना असल्याने आता शाळाशाळांमध्ये अधिकाऱ्यांना फार त्रुटी दिसू नयेत, यासाठीही धावपळ सुरू आहे.
आचारसंहितेच्या आधीची धावपळसप्टेंबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागणार असल्याने त्याआधीच हे सर्व उपक्रम संपवण्याची घाई सुरू आहे. एकीकडे महापुरासारखी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली असताना, शाळांना सुट्या देण्याची वेळ आली असताना दुसरीकडे हे अभियान, उत्सव करणे आणि त्याचे फोटो अपलोड करण्यातच शिक्षकांची ताकद जात आहे.