कोल्हापूर : प्रचंड स्पर्धा असतानाही पीएसआयची (पोलिस उपनिरीक्षक) परीक्षा देत मुलाखतीपर्यंत मजल मारली. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या अडीच वर्षांपासून पीएसआय परीक्षेचा निकालच जाहीर न केल्याने राज्यातील पीएसआयचे ६०६ उमेदवार हतबल झाले आहेत. लटकलेल्या निकालामुळे वाढते वय, लग्नाचा प्रश्न आणि करिअरची पुढची दिशाच कळत नसल्याने या विद्यार्थ्यांवर सैरभैर होण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी २८ ऑक्टोबर २०२१ या दिवशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. याची पूर्व परीक्षा २६ फेब्रुवारी २०२२ व मुख्य परीक्षा ९ जुलै २०२३ रोजी झाली. त्यानंतर दोन महिन्यात शारीरिक चाचणी होणे अपेक्षित होते. मात्र, तब्बल वर्षभराने २ ते १० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत शारीरिक परीक्षा घेतली. त्यानंतर चार महिन्यांनी मुलाखती घेतल्या. मुलाखत झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निकाल जाहीर करणे गरजेचे होते. मात्र, अद्याप निकाल जाहीर केलेला नाही.
या पदासाठी अनाथांच्या दोन जागा भरण्याबाबतचे संवर्ग संबंधित प्रकरण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मध्ये प्रलंबित आहे. याबाबत सुनावणी होत असली तरी बाजू मांडण्यासाठी त्यांना वारंवार मुदतवाढ मिळत असल्याने पीएसआयच्या ६०६ उमेदवारांचा निकाल लटकवून ठेवला आहे. परीक्षेचा निकाल लांबणीवर जात असल्याने विद्यार्थ्यांचे वय कालबाह्य ठरत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक, आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. इतर परीक्षेवरही त्यांना लक्ष केंद्रित करता येत नाही. विशेष म्हणजे यातील ६०६ पैकी कोल्हापूर जिल्ह्यातील २५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
प्रत्येक टप्प्यात उशीरमुळात परीक्षा झाल्यापासून ते मुलाखतीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आयोगाने उशीर केला आहे. त्यामुळे आयोगास निकाल लावण्यात अडचण येत असली तर अनाथ संवर्गाचा निकाल तात्पुरता बाजूला ठेवून राहिलेल्या संवर्गाचे निकाल जाहीर करावेत किंवा केवळ सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.इतरांना वेतन सुरू झाले, यांचा निकालही नाहीपोलिस उपनिरीक्षक सोबतच राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी या परीक्षा २०२१ मध्येच झाल्या. इतर परीक्षांमधील निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळून पगारपण सुरू झाला. मात्र, पीएसआयच्या विद्यार्थ्यांचा अद्याप निकालही जाहीर न झाल्याने असा अन्याय आमच्यावरच का, असा संतप्त सवाल विद्यार्थी करत आहेत.
नातेवाइकांकडून हेटाळणीपरीक्षा होऊन तीन वर्षे होत आली तरी अद्याप निकाल न जाहीर झाल्याने या विद्यार्थ्यांचे कुटुंबही मानसिक तणावात आहे. आधीच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना समाजाचे टोमणे खावे लागतात. आता हा निकाल लटकल्यामुळे नातेइकांकडून मुद्दामहून हेटाळणी केली जात असल्याचे एका उमेदवाराने सांगितले.