कोल्हापूर : आपल्या कुटुंबात पुढील दोन महिन्यात विवाह कार्य होणार असेल तर आधी त्या तारखेला कार्यालय उपलब्ध आहे का... याची खात्री जरूर करा. कारण एप्रिलमध्ये विवाह मुहूर्त नसल्याने मे महिन्यात मंगल कार्यालयांचे बुकिंग हाऊसफुल्ल होणार आहे. त्यामुळे ठरलेल्या तारखेला मनपसंत कार्यालय मिळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. पुढे जुलै ते २७ नोव्हेंबरमध्येही अशीच परिस्थिती राहणार आहे.उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे विवाह सोहळ्यांचे दिवस. शाळा - महाविद्यालयांना सुट्टी असते. शिवाय या काळात विवाह मुहूर्तदेखील जास्त असल्याने लग्नाचा धूमधडाका असतो. पण यंदा तसे होणार नाही. यावर्षी ऐन एप्रिल महिन्यात एकही विवाह मुहूर्त नाही. विवाह विधीसाठी गुरू बल असणे आवश्यक असते.
पण, एप्रिलमध्ये गुरुचा अस्त असल्याने हा काळ विवाहासाठी वर्ज्य ठरवण्यात आला आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईचा महिना विनालग्नाचा जाणार आहे, तर मे मध्ये मंगल कार्यालय मिळणे कठीण होणार आहे. त्यानंतर जुलै ते नोव्हेंबर या काळातही गुरुचा अस्त असल्याने नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत विवाह मुहूर्त नाहीत.
एप्रिलमध्ये विवाह मुहूर्त नसल्याने मे महिन्यातील बुकिंगसाठी मोठ्या प्रमाणात चौकशी होत आहे. एकदा एका पार्टीला तारीख दिली की बदलता येत नाही. एरव्ही मे मधील तारखांना जास्त मागणी असते. आता तर ही मागणी अजून वाढणार आहे. - अजित जरग, मंगल कार्यालय मालक, जरगनगर, कोल्हापूर.
वर्षातून एकदा असा गुरुचा अस्त येत असतो. एप्रिलमध्ये गौण कालातील विवाह मुहूर्त देण्यात आले आहेत. काही दिवस मुहूर्त असून, मुला-मुलीची पत्रिका आणि योग याचा विचार करून विवाह करता येतील. त्यासाठीही गुरुची शांत करून घ्यावी लागेल. - अनिल पुरोहित, (पुरोहित), कोल्हापूर
विवाह मुहूर्तमे : २, ३, ४, ७, ९, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९, ३०.जून : १, ३, ७, ८, ११, १२, १३, १४, २३, २६, २७, २८.(जुलै ते २७ नोव्हेंबरपर्यंतदेखील विवाह मुहूर्त नाहीत.)मार्चमध्ये महिन्यात १८ पर्यंतच मुहूर्तमार्चमध्ये मोजकेच विवाह मुहूर्त आहेत. आज ८, ९, १३, १७ आणि १८ या पाच दिवशीच विवाह करता येतील. त्यानंतर थेट मे च्या २ तारखेलाच विवाह मुहूर्त सुरू होतील.