कोल्हापूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या ए. एस. ट्रेडर्स कंपनीचा संचालक महेश बळवंत शेवाळे (रा. तिटवडे, पोर्ले तर्फ ठाणे, ता. पन्हाळा) हा स्वत:हून शुक्रवारी (दि. १९) आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, सोमवारपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. त्याच्या मालमत्तांचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.कमी कालावधीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ए. एस. ट्रेडर्स आणि तिच्या संलग्न कंपन्यांनी गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा सध्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास सुरू आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार याच्यासह १४ संशयितांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली असून, अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात चकरा मारणारे संशयित संचालक आणि एजंट आता स्वत:हून पोलिसांत हजर होऊ लागले आहेत. ए. एस. ट्रेडर्स कंपनीचा संचालक महेश शेवाळे याने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्याला जामीन मंजूर झाला नाही. अखेर शुक्रवारी तो स्वत:हून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत हजर झाला. पोलिसांसमोर शरण येऊन त्याने तपासात सहकार्य करण्याची कबुली दिली आहे, अशी माहिती तपास अधिकारी कळमकर यांनी दिली.
Kolhapur: ए.एस. ट्रेडर्सचा संचालक महेश शेवाळे पोलिसांना शरण
By उद्धव गोडसे | Published: January 20, 2024 5:59 PM