कोल्हापूर : ए. एस. ट्रेडर्स फसवणूक प्रकरणातील तत्कालीन तपास अधिकारी स्वाती गायकवाड आणि सांगली महापालिकेतील एका स्वीकृत नगरसेवकाची चौकशी करावी, अशी मागणी राेहित ओतारी (रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर), विश्वजीत जाधव (रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर), गौरव पाटील (रा. शाहूपुरी, कोल्हापूर) महेश धनवडे, अमित साळोखे यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली. गायकवाड यांनी आरोपींना मदत केली आणि ए. एस. मधील गुंतवणूकदारांचे पैसे स्वीकृत नगरसेवकांकडे आहेत. म्हणून या दोघांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे, गायकवाड यांनी आरोपी आशिष गावडे याला अटक केली. गावडेकडील मोबाइल तपासून त्यातील कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे सांगलीचा हवाला एजंट, सांगलीतील स्वीकृत नगरसेवकाशी संपर्क साधला. ए.एस.मधील सूत्रधार लोहितसिंग सुभेदार याचे सर्व पैसे हवालातर्फे चार लोकांनी परदेशात पाठवले आहेत. यापैकीच एक सांगलीचा हवाला एजंट आहे. सुमारे ११०० कोटी रुपये त्याने हवालातर्फे परदेशात पाठवले आहेत.पैसे हवालातर्फे पाठवणाऱ्या एजंटला आरोपी न करता त्याचा फक्त जबाब घेऊन गायकवाड यांनी सोडून दिले, याची चौकशी व्हावी. सांगलीच्या स्वीकृत नगरसेवकाने सुभेदार यास आपल्या आश्रयाखाली लपवून ठेवले होते. स्वीकृत नगरसेवकपदी निवडी होण्यासाठी ७६ नगरसेवकांना ए. एस. ट्रेडर्समधील लाखो रुपये वाटले. निवडीनंतर गोवा येथील आलिशान हॉटेलमध्ये १०० जणांची सहल आयोजित केली. म्हणून या प्रकरणातील तत्कालीन तपास अधिकारी गायकवाड, स्वीकृत नगरसेवक, एजंटची चौकशी झाल्यानंतर अनेक गोष्टी बाहेर येणार आहेत.
अनुग्रह हॉटेलमध्ये देवाणघेवाणकृती समितीवर खोटा गुन्हा नोंद करण्यासाठी कोल्हापुरातील अनुग्रह हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांमार्फत देवाणघेवाण झाली आहे. याचीही चौकशी करण्याची मागणी या निवेदनात केली आहे. त्यासाठी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.