गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या ए.एस. ट्रेडर्स ॲन्ड डेव्हलपर्ससह संलग्न कंपन्यांच्या तपासाला गती आली आहे. कंपन्यांच्या बनावट परवान्यांपासून ते संचालकांनी कोट्यवधी रुपयांची विल्हेवाट लावण्यापर्यंत धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे. ए.एस.च्या भामटेगिरीची पोलखोल करणारी वृत्तमालिका आजपासून...उद्धव गोडसेकोल्हापूर : दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून ए. एस. ट्रेडर्स कंपनीने गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये घेतले. ते पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवल्याचे कंपनीच्या संचालकांकडून वारंवार सांगितले जात होते. प्रत्यक्षात मात्र ए.एस.सह अन्य संलग्न कंपन्यांकडे कमोडिटी मार्केटिंगचे परवानेच नाहीत. काही मोजकेच पैसे इतर कंपन्यांद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवले. ४० ते ५० टक्के रक्कम देश-विदेशातील सहली, सेमिनार, हॉटेलिंग, आलिशान कार खरेदी, भेटवस्तूंवर खर्च केल्याचे तपासात उघड झाले आहे.ए.एस. ट्रेडर्स कंपनीने कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोव्हेंबर २०२२ मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला. सुरुवातीचे तीन महिने या गुन्ह्याचा तपास शाहूपुरी पोलिसांनी केला. त्यानंतर आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास वर्ग झाला. आतापर्यंत या तपासात काय हाती लागले, याचा शोध लोकमतने घेतला. गेल्या सव्वापाच महिन्यातील तपासात केवळ एका संशयिताला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले तर, नऊ संशयितांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळवले.उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार संचालकांची चौकशी सुरू असून, त्यातून गुंतवणूकदारांना धक्के देणारी माहिती समोर येत आहे.ए.एस. ट्रेडर्स, ट्रेडविंग्स सोल्युशन यासह इतर कंपन्यांची नोंदणी करताना वाहनांच्या स्पेअर पार्ट्सची विक्री, पडीक जमिनींचा विकास करणे, उद्यानांची निर्मिती, शेती आणि शेतीपूरक व्यवसाय दाखवण्यात आले. कमोडिटी मार्केटिंग आणि त्यासाठी लागणारे परवाने संचालकांनी घेतलेच नाहीत. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यापुरती मोजकी रक्कम इतर कंपन्यांद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवली. गुंतवणूकदारांनी मोठ्या विश्वासाने कंपनीकडे जमा केलेली रक्कम संचालकांनी कंपनीचा मोठेपणा दाखवण्यासाठी खर्च केली. कंपन्या सुरू करण्याच्या उद्देशातच खोट असल्यामुळे संचालकांचे बिंग फुटल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशाने तपासाला गतीअटक टाळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलेल्या नऊ संचालकांना न्यायाधीशांनी अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला असला तरी, त्यांची नाकाबंदी केली आहे. संचालकांनी तपास अधिकाऱ्यांकडे पासपोर्ट जमा केले आहेत. तसेच त्यांची बँक खाती, स्थावर, जंगम मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवरही मर्यादा आल्या आहेत.
दुबई टूर १६ कोटींचीए.एस.च्या संचालकांनी दुबई टूरसाठी १६ कोटी रुपये उधळले. यात काही एजंट आणि गुंतवणूकदारांचाही समावेश होता. पुण्यातील हॉटेल ऑर्किडमध्ये झालेल्या पार्टीसाठी आठ कोटी रुपये खर्च केले. संचालकांसाठी आलिशान कार खरेदी, एजंटाना भेटवस्तू देण्यासाठी कोट्यवधींचा चुराडा केल्याचे तपासातून स्पष्ट झाले.दिशाभूल करण्यासाठी वाढवल्या कंपन्यागुंतवणुकीचा ओघ वाढताच कंपनीकडे कोट्यवधी रुपये येऊ लागले. एकाच कंपनीची मोठी उलाढाल दिसल्यास सरकारी यंत्रणांच्या नजरेत येईल, या भीतीने संचालकांनी इतर कंपन्या सुरू करून व्यवहार अन्यत्र वळवले. कार्यालयातील लिपिक, ऑफिस बॉय यांच्या नावावरही कंपन्या सुरू करून गुंतवणूकदारांची फसवणूक केली.